कृषिपर्यटनाची जागतिक स्तरावर ओळख होऊन कृषिपर्यटनाला चालना मिळावी म्हणून १६ मे हा दिवस जागतिक कृषिपर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त काही लोकप्रिय कृषिपर्यटन केंद्राची ओळख...
सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या कुशीत, सगुणा बाग हे ५५ एकरचे सुंदर शेत नेरळ, कर्जत, मालेगावला वसलेलं आहे. सगुणा डेअरी या नावाने स्वातंत्र्यापूर्वी ओळखले जाणारे हे शेत साधारणपणे १९६० नंतर "सगुणा बाग" या नावाने ओळखायला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच शेती आणि शेतीसंबंधी कार्यामध्ये सगुणाबाग काम करत आहे. कृषीपर्यटन या संकल्पनेचा जन्म सगुणा बागेमध्ये १९८५ साली झाला. आणि आत्तापर्यंत त्यात अनेक बद्दल सुद्धा झाले. सध्या "सगुणाबाग" हे सर्वात लोकप्रिय असे कृषी पर्यटन केंद्र शहरी बांधवांसाठी झाले आहे. सध्या हजारोच्या संख्येने पर्यटक विद्यार्थी आणि शेतकरी सगुणा बागेला भेट देतात आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेतात.
कुसुम कृषी पर्यटन आणि सहल केंद्र हे जालना जिल्ह्यातील मंठा रोड येथे दहा एकरामध्ये विकसित झाले आहे. या कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री.एकनाथ मुळे असून सदर कृषीपर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारची फळपिके, जुन्या शेती औजाराचे म्युझियम, संपूर्ण सेंद्रिय शेती, आनंद सदनाची निर्मिती, महिला केंद्रित संख्या असून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही महत्त्वाची वैशिष्ट्य या कृषिपर्यटनाची आहेत.
योरामा- मायारा कृषी पर्यटन केंद्र हे नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील नवरगाव येथे विकसित केले आहे. या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका सौ.मंजुषा योगेंद्र मोडक या आहेत. या कृषी पर्यटनात त्यांनी विदेशी पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या पोर्ला इस्टेट राजा नवाब मिर युसुफ अली यांचे म्युझियम नवरगाव येथे उभारणी केली आहे. येथे त्यांनी शेकडो दुर्मिळ विविध प्रकारच्या देशी वाणाच्या झाडांची लागवड केली आहे. यामुळे पूर्वी विरळ दिसणाऱ्या पक्षी, फुलपाखरे, मधमाशांचे पोळे यात मोठ्या संख्येने वाढ होऊन पर्यटकांचे नंदनवन उभे केले आहे. येथे शेळीपालन, ससेपालन, मत्स्यपालन, फळबाग, सेंद्रिय पीक शेती इ. विविध प्रकल्प आहेत.
मोठ्या शहरातील वाढती वर्दळ, प्रदूषण यामुळे प्रत्येक कुटुंब हे मानसिक तणावाखाली राहत आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहे. असेच शांत आणि निसर्गरम्य ठिकाण मुंडवडा कृषीपर्यटन केंद्र आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुंडवाडा या गावात हे केंद्र आहे. या केंद्राची स्थापना श्री. निलेश खेडकर यांनी केली.
मॉन्टेरिया व्हिलेज हा एकूण ३६ एकरचे कृषी पर्यटन आहे. ह्या कृषि पर्यटनाची सफर तुम्हाला तुमच्या गावापर्यंत घेऊन जाईल असा अनुभव येतो. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून दोन तासांच्या अंतरावर कर्जत, कलोते येथे वसलेले हे ठिकाण आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी गावातील जीवनाचा संपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. शांत वातावरण निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेले हे सुंदर ठिकाण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील घारपी हे गाव आहे. त्या ठिकाणी कन्नई कृषी पर्यटन केंद्र आहे. कन्नई ऍग्रो टुरिझम सेंटरमधील हिरवेगार आणि समृद्ध शेतीचे निरीक्षण हा एक सुंदर आणि मनोहारी क्षण आहे. या ठिकाणी काजू, नारळ, संत्रा, भुईमूग, सुपारी, जॅकफ्रूट, सिल्व्हर ओक, एवोकॅडो आणि रॅम्बुटन ही झाडे येथे विपुल प्रमाणात आहेत. कन्नई ऍग्रो टुरिझमच्या सत्तर एकर परिसरात लेमनग्रास, अननस, स्ट्रॉबेरी, संत्रा, केळी, कॉफी, कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, आले आणि आंबा यांची मोठी लागवड आहे. याशिवाय अद्वितीय औषधी गुणधर्म असलेल्या जगातील काही दुर्मिळ वनस्पती आणि झाडे देखील येथे तुम्हाला पाहावयाला मिळतील.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ग्रीशास कृषी पर्यटन केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घोगली गावात केली आहे. या केंद्राचे संचालक सतीश नानाजी मोहोड हे आहेत. सदर पर्यटनाच्या ठिकाणी सेंद्रिय तसेच जैविक खताचा वापर करून ग्रीननेट व शेडनेटमध्ये घरगुती भाजीपाला, गुलाब इ. प्रकारचे उत्पादन घेण्यात येतात. पर्यटकांच्या मनोरंजनाकरीता स्विमिंग पूल, रेन डान्स, कॅनल व सिंगिंग प्लॅटफॉर्म, खेळण्याकरिता प्रशस्त जागा, उद्यानासह तसेच लहान मुलांना खेळण्याकरिता विविध प्रकारची खेळणी व मनोरंजनाकरिता विविध साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कृषीपर्यटन केंद्रात रात्रीच्या मुक्कामासाठी राहण्याकरिता उत्तम व्यवस्था आहे.
चैतन्य कृषी-पर्यटन आणि साहसी उद्यान हे निसर्गाच्या सान्निध्यात छत्रपती संभाजीनगर जवळील गंगापूर गावात वसलेले आहे. सुटीचा आनंद मिळवण्यासाठी,तुमचा शनिवार व रविवार घालवण्यासाठी हे एक इको-फ्रेंडली ठिकाण आहे. हिरव्यागार वातावरणाने वेढलेला परिसर जिथे तुम्हाला शुद्ध हवा अनुभवता येईल. येथे गायपालनाचा प्रकल्प आहे. या कृषिपर्यटन केंद्रात तुम्ही मातीच्या चुलीवर बनवलेल्या स्वादिष्ट ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी जैवविविधता असून निसर्ग आणि प्राणी प्रेमींसाठी एक शांत निसर्गानुकूल जागा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून येथे सेंद्रिय शेती केली जाते. चैतन्य कृषीपर्यटनात मातीच्या घरात राहण्याचा अनुभव घेता येतो.
श्री रामबाग कृषी पर्यटन केंद्र हे परभणी जिंतूर रोडवरील धर्मपुरी येथे आहे. या केंद्राचे संचालक डॉ. संजय टाकळकर हे आहेत. २६ एकरमध्ये हे कृषी पर्यटन असून येथे शिवारफेरी, आयुवेर्दिक गार्डन, तारांगण, फळ लागवड, पशुपालन केले आहे. अनंत हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र हे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात मौजे झुंजारपूर येथे आहे. वडिलोपार्जित ५० एकर शेतीत कृषिपर्यटन असून येथे वर्हाडी पद्धतीचे जेवण मिळते. तूर, कापूस, सोयाबीन, हळद यांची पिके, सेवा सुविधा लक्झरीयस आहेत. येथे जवळच टिपेश्वर अभयारण्य असल्यामुळे वन्यजीव पर्यटक येतात. त्यामुळे येथे कृषी पर्यटकाबरोबर वन्यजीव पर्यटक नेहमी मोठ्या संख्यने येत असतात.
सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे अभिषेक मळा कृषीपर्यटन केंद्र आहे. निसर्गरम्य परिसरात आपलं घर असावं अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. नेत्रसुखद असा परिसर नजरेत भरून घेत छान हुरड्याचा अन् भोजनाचा आस्वाद घेत आयुष्यातील काही क्षण घालवावेत असे प्रत्येकाला वाटते. त्या प्रश्नांचे उत्तर अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्राकडे असावे असे मला वाटते.
नेचरब्लिस कृषी पर्यटन केंद्र हे वाशीम जिल्हा, कारंजा लाड तालुक्यातील मानाभा या गावी वसलेले आहे. या ठिकाणी सेंद्रिय शेती केली जाते. नेचरब्लिस ऑरगॅनिक फार्म या अंतर्गत कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, सेंद्रिय बियाणे बँक, अन्न प्रक्रिया युनिट्स, शेतकऱ्यांसाठी इडीपी केंद्र इ.शेती व्यवसायाचे सर्व पैलू आहेत. हा प्रकल्प भारतातील ‘नेक्स्ट जनरेशन फार्मर’चे उत्कृष्ट प्रदर्शन असल्याचे लक्षात येते. हा एक आदर्श कृषिपर्यटन प्रकल्प असून जो तरुण आणि महिलांसाठी अधिक व्यवसाय संधी निर्माण करून ग्रामीण भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे प्रकल्प प्रमुख श्री.राहुल देशमुख यांनी सांगितले.
आनंद कृषी पर्यटन केंद्र हे सातारा येथून १८ कि.मी.अंतरावर बोरगाव येथे आनंद कृषी पर्यटन वसले आहे. या कृषी पर्यटनात उन्हाळ्यात आरामदायी खेळ खेळले जातात. या कृषी पर्यटनात स्विमिंग पूल असून यावेळी विनामूल्य स्विम सूट येथे दिला जातो. रेन डान्स, रोलर बॉल डान्सिंग, बोटिंग, धबधबा, फोटोसेशन, गार्डन सेल्फी पॉइंट्स, चिल्ड्रन पार्क स्विंग्स, फनी राईड्स, रोपवे, स्लाइडिंग पूल, ट्री हाऊस, फनी मिरर, (भुलभुलैय्या), संतदर्शन, लॉन, जेवणाची उत्तम सोय आहे. या वेळी नाश्त्यासह चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळते. आनंद कृषी पर्यटनात शेकडो वृक्ष आहेत. निसर्गाच्या सहवासात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. आनंद कृषी पर्यटनाला भेट देणे हे आनंददायक अनुभव असल्याच्या अनेक पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत.
स्वग्राम हे आयुर्वेद,योग,निसर्ग,कृषीपर्यटन आणि जैवविविधता केंद्र आहे. आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती हे जगातील पहिली नैसर्गिक जीवनशैली आहे. या कृषिपर्यटन केंद्रात रोगग्रस्त व्यक्तीसाठी नैसर्गिक वैद्यकीय प्रणाली समाविष्ट आहे. मुख्यत्वे आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती ही ज्ञान, शास्त्र, तंत्र, कर्मक्रिया-कार्य, खेळ, कला, उत्सव समारंभ या विविध उपक्रमाद्वारे हे कृषिपर्यटन राबवले जाते. पूर्वीची १२ बलुतेदारांची वस्तुविनिमय प्रणाली येथे पाहावयास मिळते. हे कृषिपर्यटन पुणे जिल्ह्यातील लवळे, मुळशी येथे वसलेले आहे.
शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या कृषिपर्यटन केंद्रात आहेत. शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतो.
नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. या कृषिपर्यटन केंद्रात कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली. माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी, वारली चित्रकला इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.
एक दिवसीय सहल, कौटुंबिक सहली आणि कॉर्पोरेट सहलीसाठी सुप्रसिद्ध ठिकाण असलेले मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्र आहे. हे केंद्र नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी येथे अहमदनगरपासून फक्त २५ कि.मी. अंतरावर आहे. मामाचा मळा पर्यटकांना वास्तववादी ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देतो. सात एकरांपेक्षा जास्त असलेला हिरवागार निसर्गरम्य मामाचा मळा खरोखरच विलक्षण आहे. हा मळा लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूप मनोरंजक ठरत असल्याचा अनुभव आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मधुबन कृषी पर्यटन केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र आणि सर्वोत्तम एक दिवसीय पिकनिक स्पॉट आहे. लोक इथे येऊन समाधानाने आपला वेळ घालवू शकतात. दैनंदिन जीवनातील डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मधुबन कृषी पर्यटन केंद्र हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे कोणीही कुटुंबासह येथे राहू शकतो, खेळ खेळू शकतो, गावातील जीवन विलक्षण आनंदाने जगू शकतो. स्वादिष्ट भोजन आणि प्रीमियम सेवा ही या पर्यटन केंद्राची खासियत आहे. या सर्व कृषिपर्यटन केंद्रांना नाशिक येथे कृषीथॉन प्रदर्शनात आदर्श कृषिपर्यटन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे.