काही वर्षापासून सेंद्रिय शेतीविषयी चर्चा आपण ऐकत आहे. कीड व रोगनाशक मुक्त अन्न कसे वापरावे याबद्दल सोशल मीडियाद्वारे लोकांना माहिती मिळत आहे. शहरात राहणारी अनेक कुटुंबे आता किचन गार्डन करत आहेत. ही कुटुंबे स्वतःच्या बागेत भाज्या वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु बऱ्याच जणांची जागेअभावी निराशा होत आहे. त्यासाठी हायड्रोपोनिक शेती ही सर्वात आकर्षक योजना ठरत आहे.
हायड्रोपोनिक्स संकल्पना
ही नवीन शेती संकल्पना केवळ घरोघरीच प्रिय नाही, तर अनेक शेतकरी आणि कृषी व्यवसाय सुरू करणार्यांनी हायड्रोपोनिक शेती कि ज्याला माती नसलेली शेती असेही म्हणतात. ‘हायड्रो’ म्हणजे पाणी आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून माती विना वनस्पतीची वाढ करणे होय. या तंत्रज्ञानाचे घरातीलच उदाहरण द्यायचे म्हणजे घरात बाटलीत पाणी भरून त्यात आपण मनी प्लांट वाढवतो . या पद्धातीमध्ये वनस्पतीच्या वाढीला लागणारे घटक पाण्यातून पुरविले जातात व मातीविना सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती वाढविल्या जातात. पारंपारिक पद्तीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली उर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळाच्या वाढीसाठी वापरली जाते परंतु हायड्रोपोनिक्समध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.
भाजीपाला व चारा पिक निर्मिती
या पद्धतीने भाज्या,चारा पिके आपण वाढवू शकतो. तिथे भाज्याही वनस्पती मर्यादित जागेत पौष्टिक द्रावणात पद्धतशीरपणे वाढतात. आधुनिक शेतीचा हा एक नवीन मार्ग आहे. आणि या उत्पादनांना एक विशिष्ट बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ अनेक राज्यांमध्ये आणि हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, जयपूर, गुजरात यांसारख्या शहरांमध्ये पसरली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला लागवड करणे ही या शेतीची मुख्य कल्पना आहे. हायड्रोपोनिक्स शेतीचे दोन प्रमुख फायदे आहेत एक म्हणजे कीटकनाशकांचा शून्य वापर आणि दुसरा म्हणजे हमी असलेले पीक आहे.
हायड्रोपोनिक्ससाठी लागणारे साहित्य
हायड्रोपोनिक्ससाठी तयार प्रकल्प बाजारात उपलब्ध आहेत. घरगुती किट्सची किंमत सुमारे रु. ८,००० आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर हायड्रोपोनिक्स शेती पद्धतीसाठी मोठी भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात १ एकर ते १.५० एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यासाठी ३० ते ४० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. परंतु स्वस्तात प्रकल्प उभारणीसाठी सहज उपलब्ध होणारे साहित्य घेऊनही हा प्रकल्प उभारता येईल.
सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून निर्मिती
यासाठी पसरट प्लास्टिक ट्रे लागत असून या ट्रेला खालच्या बाजूला छोटे छोटे छिद्रे पाडून घ्यावीत म्हणजे त्यातून अतिरिक्त पाणी वाहून जाते. हे ट्रे ठेवण्यासाठी लोखंडी रॅक लागतात. या रॅकचे पाच ते सात टप्पे करून एका वर एक असे ट्रे ठेवण्यासाठी सोय करण्यात यावी. या हायड्रोपोनिक्स पद्धतीत प्रकल्प क्षमतेनुसार पाण्याची मोटार वापरावी. स्प्रिंकलरच्या प्लास्टिकच्या नळ्या व फोगर वापरून सर्वत्र सारख्या प्रमाणात पाणी फवारले जाईल अशी सोय करावी. यासाठी टायमर मशीन वापरून दर दोन तासाने ३-६ मिनिटे मोटार चालू करून पाणी स्प्रिंकलरने फवारण्याची सोय करावी. सावलीसाठी शेड नेटचा वापर करावा. हे शक्य नसल्यास झारीने पाणी फवारले तरी चालते.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने भाजीपाला व चारा निर्मिती
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने लेट्युस, ब्रोकोली, कोथिंबीर व इतर हंगामी भाजीपाला निर्मिती करता येतो. या पद्धतीने भाजीपाल्याचे निरोगी उत्पादन घेता येते. भाजीपाल्यावर कुठलाही रोग येत नाही. या पद्धतीने उत्पादन घेण्यास कमी वेळ लागतो.हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने चारा निर्मिती करण्यासाठी मका, गहू, बार्ली किंवा ओट यांसारखे तृणधान्ये वापरून चारा निर्मिती करता येते. यासाठी धान्य बारा तास पाण्यात भिजवावे. त्यानंतर १२ ते २४ तास मोड येण्यासाठी गोणपाटात गुंडाळून ठेवावे. आणि हेच मोड आलेले धान्य प्लास्टिक ट्रे मध्ये पसरवून एक थर बनवावा. आणि हे रॅकमध्ये ठेवावे.त्यावर दर दोन तासाने पाच मिनिटे पाणी स्प्रिंकलरने फवारण्याची सोय करावी. दहा ते बारा दिवसात अंकुर वाढून २५-३० से.मी. उंच वाढतात. एक किलो धान्यापासून आठ ते दहा किलो हिरवा, सकस व ताजा चारा तयार होतो.