एटीएम न्यूज (नाशिक): महाराष्ट्रात (Maharashtra) आगमनाची वर्दी देतांना दक्षिण कोकणात (Konkan) मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असले तरी राज्यभर त्याची पुढील वाटचाल अपेक्षेपेक्षा संथ राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केली आहे. त्यामुळे १५ जूनपूर्वी (15 June) समाधानकारक आणि व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकार आणि कृषी विभागाने केले आहे.
१५ जूनपूर्वी पेरणीस पोषक इतका पाऊस नाहीच
हवामान तज्ज्ञांच्या (Meteorologist) माहितीनुसार, देशात नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) वेगाने पुढे सरकत असला तरी महाराष्ट्रात त्याचा वेग काहीसा मंदावणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक (Karnataka), तेलंगणा (Telangana), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh)आणि ओडिशाच्या (Odisha) काही भागांत मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहणार आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागांमध्ये पेरणीसाठी आवश्यक असा सातत्यपूर्ण पाऊस पडण्याची शक्यता अद्याप कमी आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात वादळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जूनपर्यंत विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), खानदेश (Khandesh) आणि मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) काही भागांत ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस स्थानिक स्वरूपाचा असण्याची शक्यता असून संपूर्ण क्षेत्रात पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे चित्र सध्या दिसत नाही.
उष्णतेचा तडाखा कायम राहणार
राज्यातील अनेक भागांमध्ये १२ जूनपर्यंत (12 June) उष्णतेची लाट कायम राहू शकते. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
पेरणीची घाई केल्यास नुकसान होण्याची भीती
कृषी तज्ज्ञांच्या (Agricultural Expert) मते, सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केल्यास आणि त्यानंतर पाऊस खंडित झाल्यास बियाण्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थिर आणि समाधानकारक पावसाची प्रतीक्षा करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला कृषी विभागाने (Agriculture Department) दिला आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे
राज्यातील लाखो शेतकरी (Farmes) आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत. १५ जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्यानंतर खरीप हंगामाच्या (Kharif season) पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगून हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.