एटीएम न्यूज (नाशिक): जून महिना अर्धा संपत आला तरी महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक भागांत मान्सूनचा (Monsoon) अपेक्षित जोर दिसून आलेला नाही. देशभरात सरासरीपेक्षा तब्बल ६४ टक्के कमी पाऊस नोंदविला गेला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही (Districts) पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. परिणामी खरीप (Kharif) हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर (Farmers) मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पेरण्या रखडल्याने शेतकरी चिंतेत
यंदा मान्सूनने अंदमानातून (Andaman) वेळेआधी प्रवेश केला असला तरी त्याची पुढील वाटचाल मंदावली आहे. वातावरणातील बदल, तसेच उत्तर भारतातून (North India) वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची प्रगती थांबल्याचे हवामान तज्ज्ञांचे (Meteorologist) मत आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला असून पावसाची प्रतीक्षा अधिक लांबली आहे.
सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून काही शेतकऱ्यांनी पेरणीची (Sowing) तयारी पूर्ण केली आहे, तर अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस (Monsoon) आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी क्षेत्रासाठी (Agricultural sector) ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.
उपग्रह चित्रांमध्ये ढग दिसताय गायब
'इनसॅट-३डीएस' उपग्रहाच्या निरीक्षणांमध्ये महाराष्ट्रासह मध्य व दक्षिण भारतातील बहुतांश भाग ढगविरहित दिसून आला आहे. मान्सून सक्रिय असल्याचे संकेत देणारे दाट ढग कमी प्रमाणात दिसत असल्याने व्यापक स्वरूपाच्या पावसाला अद्याप पोषक वातावरण तयार झालेले नाही.
मान्सून सक्रिय होण्याची शक्यता २० जूननंतरच
हवामान विभागाच्या (Meteorological Department)अंदाजानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. २० जूननंतर कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जूनच्या अखेरीस मान्सून अधिक प्रभावी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
सध्याचा पाऊस बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा असल्याने घाईघाईने पेरणीचे निर्णय घेऊ नयेत, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. अधिकृत हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेती कामांचे नियोजन (Farming Planning) करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या लाखो शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा चिंतेत असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे.