एटीएम न्यूज (नाशिक): संभाव्य अल नीनो तसेच कमी पर्जन्य (पाऊस) अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) देशभरातील शेतकऱ्यांच्या (Farmers) हितसंरक्षणासाठी व्यापक तयारी सुरू केली असून शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचा विश्वास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी व्यक्त केला आहे. हवामानातील (Weather) आव्हानांचा शेतीवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दिल्लीतील (Delhi) कृषी भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत चौहान यांनी दक्षिण-पश्चिम मान्सून, संभाव्य अल नीनोचा (El Nino) प्रभाव, सध्याची जलसाठ्यांची स्थिती, बियाण्यांची उपलब्धता, पीक नियोजन आणि राज्यांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
हवामान विभागाने २०२६ चा नैऋत्य मान्सून (Monsoon) सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ज्यात सरासरी पर्जन्यमान (Rainfall) दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून हंगामात अल नीनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने आधीपासूनच तयारीला वेग दिला आहे.
मात्र, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे सांगताना चौहान म्हणाले की, सरकार पूर्णपणे सतर्क असून हवामानातील संभाव्य आव्हानांचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
जलसाठा समाधानकारक असल्याने खरीप हंगामाला दिलासा
बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा सध्या समाधानकारक असून तो या कालावधीतील सरासरीपेक्षा १२७ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सिंचन गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असून जमिनीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासही फायदा होणार आहे.
कमी पावसाच्या भागांवर विशेष लक्ष
कमी पाऊस, दीर्घ कोरडे कालखंड किंवा अल नीनोचा अधिक प्रभाव पडण्याची शक्यता असलेल्या राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश देखील चौहान यांनी या बैठकीदरम्यान दिले. जिल्हास्तरावरील आकस्मिक कृती आराखडे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पर्जन्याचे प्रमाण, उपलब्ध जलस्रोत, पीक पद्धती, बियाण्यांची उपलब्धता आणि हवामान जोखमी लक्षात घेऊन जिल्हानिहाय उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
बियाणे, पर्यायी पिके अन पुनर्पेरणीची तयारी
खरीप आणि रब्बी हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असून, राखीव साठाही तयार ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिके, कमी कालावधीत तयार होणाऱ्या व कमी पाण्यात येणाऱ्या वाणांची उपलब्धता तातडीने करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत चौहान यांनी बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले.
जलसंवर्धन आणि नमी व्यवस्थापनावर भर
शेततळी, जलसंधारण संरचना, पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रम आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या उपाययोजनांवर तत्काळ काम करण्याचे निर्देश देण्यात आले. कमी पावसाच्या परिस्थितीतही प्रभावी जलव्यवस्थापन आणि आर्द्रता संवर्धनामुळे पिकांचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते, असे चौहान यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार तातडीची माहिती
हवामानातील बदल, रोग-कीड प्रादुर्भाव, पेरणी नियोजन, सिंचन आणि पर्यायी पीक व्यवस्थापनाबाबतची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत मोबाईल (Mobile) संदेशांद्वारे पोहोचविण्यावर सरकारचा भर राहणार आहे. राज्य यंत्रणा, कॉल सेंटर, कृषी अधिकारी आणि डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य सल्ला देण्यासाठी विशेष यंत्रणा बळकट करण्यात येणार आहे.
संयुक्त कृती आराखड्याला प्राधान्य
जलसंपदा (Water Resources), बियाणे (Seeds), सिंचन (Irrigation), रोग-कीड नियंत्रण (Pest Control) आणि ग्रामीण विकासाशी संबंधित सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश कृषिमंत्री चौहान यांनी दिले. तसेच हवामानाशी संबंधित संकटांचा सामना करण्यासाठी समन्वित आणि तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारचे उद्दिष्ट केवळ संभाव्य धोका ओळखणे नसून वेळेआधी उपाययोजना करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कायम राखणे, शेतीतील सातत्य टिकविणे आणि खरीप हंगाम यशस्वी करणे हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source : PIB