एटीएम न्यूज (नाशिक): यंदाच्या मॉन्सूनच्या बाबतीत देशावर चिंतेचे ढग दाटले आहेत. हवामान तज्ज्ञांनी अलीकडेच जाहीर केलेल्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशात सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा शेतीसह विविध क्षेत्रांपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, देशातील पावसावर अवलंबून असलेल्या कृषीप्रधान मॉन्सून गाभा क्षेत्रातही (Monsoon Core Zone) मध्येही पावसाचा तुटवडा जाणवू शकतो. या भागात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने पर्जन्यमानातील घट शेती उत्पादनावर परिणाम करू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रासमोरही कमी पावसाची चिंता
महाराष्ट्रासाठीही यंदाचा पर्जन्यमानाचा अंदाज फारसा दिलासादायक नाही. राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि इतर अनेक भागांत पावसाचा तुटवडा जाणवू शकतो. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही तुरळक भागांमध्ये मात्र सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता आहे.
जून महिन्यातही राज्यातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आणि वाढती उष्णता अशा दुहेरी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो.
देशभरात असमान पावसाचे संकेत
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ईशान्य भारतात मात्र तुलनेने सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात अली आहे. देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण असमान राहण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे, जिथे काही भागांना पावसाच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागेल, तर काही भागांत मात्र सामान्य पाऊस पडेल असा अंदाज आहे.
एल निनोचा प्रतिकूल परिणाम
प्रशांत महासागरात एल निनो परिस्थिती विकसित होण्याचे संकेत मिळत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे. एल निनोचा भारतीय मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे यापूर्वीच्या अनेक अनुभवांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनबाबतची चिंता अधिक वाढली आहे.
कमी पावसामुळे जलाशयांवरील ताण वाढणे, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होणे, शेती उत्पादनात घट, वीज निर्मितीवर दबाव आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका अशी विविध आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणी बचत, दुष्काळ व्यवस्थापन आणि उष्णतेविरोधी उपाययोजनांना अधिक गती देण्याची गरज अधोरेखित होत आहे. मॉन्सूनची प्रत्यक्ष वाटचाल कशी राहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, सर्वांसमोरच चिंतेचे ढग दाटले आहेत.