एटीएम न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाच्या जागा आता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. या जागांवर कंपन्यांकडून उत्पादने तयार करून घेत त्यावर महामंडळाचा शिक्का मारुन ती शेतकऱ्यांना विकण्याचे नवे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
महामंडळाचे उद्दिष्ट
दर्जेदार निविष्ठा व गुणवत्तापूर्ण आधुनिक अवजारे स्वतः राज्यातील शेतकऱ्यांना विकावीत अशी मूळ जबाबदारी महामंडळावर होती. त्याचबरोबर चांगल्या कंपन्यांसोबत करार करून खासगी उत्पादनेदेखील महामंडळामार्फत शेतकऱ्यांपर्यंत जावी व त्यातून महामंडळाने नफा कमवावा असेही उद्दिष्ट महामंडळाचे होते. महामंडळाची अनेक उत्पादने बंद पडली. नवी उत्पादने मोठ्या प्रमाणात तयार झाली नाहीत. तसेच खासगी कंपन्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या विक्री पुरवठ्याचे जाळेही महामंडळाला उभारता आले नाही.आता महामंडळाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे.
कार्यशाळेची जागा उत्पादकांना भाडेतत्वावर
पुण्याच्या चिंचवड भागात 'कृषिउद्योग'ची कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा आहे. पुरेसे मनुष्यबळ, संशोधन व विकास प्रणालीचा अभाव यामुळे कार्यशाळेची कोट्यवधी रुपयांची मोकळी जागा पडून आहे. ही जागा आता खासगी कंपन्यांना किंवा उत्पादकांना भाडेतत्वावर दिली जाईल. भाडेतत्वावर जागा वाटण्यासाठी ई-निविदादेखील काढण्यात आलेल्या आहेत.
कृषी अवजारे तयार करणार
भाडेतत्वावर भूखंड वापरले गेल्यास महामंडळाला भाडेपट्टा मिळेलच; पण नवी उत्पादने मिळून उत्पन्नातही वाढ होईल, असा दावा 'कृषिउद्योग' करते आहे. भाडेतत्वावरील जागांमधून पहिल्या टप्प्यात किमान १७ कृषी अवजारे तयार व्हावीत, असा प्रयत्न 'कृषिउद्योग'चा आहे. यात दोन प्रकारचे हातचलित फवारणी पंप, चार प्रकारचे बॅटरीचलित फवारणी पंप व तीन प्रकारच्या बॅटरीसह हातचलित अशी सुविधा असलेल्या फवारणी पंपांचा समावेश आहे.
उत्पादनावर 'कृषिउद्योग'चा ठसा
या कंपन्या विविध उत्पादने तयार करतील व त्यावर महामंडळाचा 'कृषी उद्योग'चा ठसा टाकला जाईल. राज्य व परराज्यातील काही कंत्राटदार कृषी अवजारांच्या बाजारांमध्ये गुणवत्ताहिन उत्पादने विकतात। हेच कंत्राटदार भविष्यात महामंडळाच्या भूखंडावर स्वतःचे कारखाने थाटू शकतात. त्यामुळे गुणवत्तेच्या तक्रारी आल्यास शेतकरी नाराज होऊ शकतात. त्यामुळेच महामंडळाला या प्रकरणात खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे.