एटीएम न्यूज नेटवर्क : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. १०३ सहकारी तर १०४ खासगी अशा एकूण २०७ कारखान्यांतून साखरेचे उत्पादन घेतले जात आहे. यातील चार कारखाने बंद झाले आहेत. सध्या सरासरी ९.७ साखर उतारा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या वर्षी साखर उत्पादनात किमान दहा टक्के घट होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्यावर्षी १०५ सहकारी व १०३ खासगी अशा एकूण २०८ कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. मागील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८०५.१५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन ७८६.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी ऊस गाळप व साखर उत्पादनात घट झाली आहे.
ऊसतोडणी कामगाराअभावी अनेक कारखाने फेब्रुवारीतच बंद पडू शकतील. मार्चअखेर राज्यातील ७० टक्क्यापेक्षा अधिक कारखान्यांचा हंगाम बंद झालेला असेल.साखर उताऱ्यात फारसा फरक नसला तरी गाळप क्षमता घटल्याने उत्पादन कमी होणार आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. विभागात ४० कारखान्यातून आतापर्यंत १६५.९९ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १८३.६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
विभागाचा साखर उतारा ११.०६ आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असुन विभागातून १५४.९१ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून १५४.१४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर साखर उतारा ९.९५ राहिला आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ५० कारखान्यातून १५६.७२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन त्याद्वारे १३९.४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. पश्चिम महाराष्ट्र व पुणे विभागाच्या तुलनेने साखर उताऱ्याच्या बाबतीत पिछाडीवर आहे. सोलापूर विभागाचा साखर उतारा ८.९ पर्यंत खाली आला आहे. अहमदनगर ९.४, छत्रपती संभाजीनगर ८.३४, नांदेड ९.६३, अमरावती ९.०१ तर नागपूर विभागाचा साखर उतारा केवळ ४.४२ आहे.
साखर उतारा घटण्याचे मुख्य कारण बहुतांश साखर कारखाने हे इथेनॉल निर्मितीकडे वळल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात मळीतुन साखर बायपास केली जात असल्याने त्याचा थेट परिणाम साखर उताऱ्यावर होतो. नाशिक जिल्ह्यातील ९ पैकी फक्त चारच कारखाने सुरू आहेत. यात तीन खासगी तर फक्त एकच कादवा सहकारी साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू आहे. जिल्ह्यातील बंद असलेले नाशिक, रानवड, रावळगाव हे कारखाने पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला परत एकदा घरघर लागली आहे.
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकली आहेत. कामगारांचे कोट्यावधी रुपये थकीत आहेत. वेतन, ग्रॅज्युटीची रक्कम मिळालेली नाही. कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे. आजारी कारखान्यांबाबत शासनाने ठोस धोरण आखावे. शेतकरी व कामगारांची देणे देण्याची व्यवस्था करावी. दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी साखर उत्पादनात घट होणार आहे. साखर उत्पादनाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कारखानदार, शेतकरी व कामगारांना दिलासा द्यावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.