एटीएम न्यूज नेटवर्क ः हैदराबाद येथील नुझिवीडू सीड्स या बियाण्यांवर संशोधन करणाऱ्या कंपनीने मिरचीच्या नवीन संकरित 'एनसीएच-6889' या वाणावर संशोधन केले आहे. हे वाण लवकरच भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
फुले आणि फळांच्या पानावरील कीटकांचा (ब्लॅक थ्रीप्स) प्रादुर्भाव सहन करण्याची ताकद या वाणामध्ये आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पूर्व भारतातील मिरची उत्पादक राज्यांमध्ये गेले दोन वर्षे या वाणाची संकरित चाचणी घेण्यात आली. लागवडीचा खर्च कमी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्तम दर्जा आणि उत्पादनासाठी हे महत्त्वाचे साधन ठरले आहे.
'एनसीएच-6889' हे भारतातील सर्व मिरची उत्पादक क्षेत्रांत उच्च उत्पन्न देणारे संकरित वाण आहे. भारतातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये चालणारे उत्कृष्ट फळाची गुणवत्ता असलेले आणि कमी देखभाल खर्च लागणारे हे वाण शेतकर्यांना उच्च परतावा देऊ शकते. कीटकांचा (ब्लॅक थ्रीप्स) आणि एलसीव्ही या रोगांचा प्रादुर्भाव सहन करण्याची शक्यता असल्यामुळे कीटकनाशक वापराचा खर्च कमी होतो.
दक्षिण पूर्व आशियामध्ये कीटक प्रजातींपैकी एक ब्लॅक थ्रीप्स ही कीटकांची व्यापक प्रजाती आढळते. या आक्रमक कीटकांच्या प्रादुर्भावामुळे मिरची पिकाच्या फुलावर आणि पानांच्या खालच्या बाजूला मोठे नुकसान होते. कीटकांच्या लहान अळ्या पानांच्या पृष्ठभागांवर असतात, तर प्रौढ कीटक आणि त्यांच्या अळ्या असे दोघेही मिळून झाडांचा रस शोषून नुकसान करतात.
मोठा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर, फुलांच्या गळतीवर परिणाम होतो. फळांचा संच आणि विकास कमी होतो. परिणामी उत्पादनाचे नुकसान होते. 2021 मध्ये देशाच्या दक्षिणेकडील मिरची उत्पादक भागात थ्रीप्स प्रजातींच्या तुलनेत ईशान्य मान्सूनच्या अतिवृष्टीमुळे टी. पारविस पिनसचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून आला. अनेक रसायनांची फवारणी करूनही शेतकरी या नवीन प्रजातीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. त्यामुळे 60-70 टक्के पिकांचे नुकसान झाले.
'एनसीएच-6889'च्या लागवडीमुळे भारतीय मिरची उत्पादक शेतकर्यांना ब्लॅक थ्रीप्समधून मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नाच्या हमीसह रासायनिक फवारणीच्या खर्चात प्रति एकर 10000 रुपयांपेक्षा अधिक बचत होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)