एटीएम न्यूज नेटवर्क : नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित एस.आय.ए.एल.प्रदर्शनात महाराष्ट्रातील पुणे येथील पुरंदर हायलँड्स एफपीसी लिमिटेडने जगातील पहिल्या प्रकारच्या "फिग ज्युस" (अंजीर ज्यूस) साठी प्रतिष्ठित नवोन्मेष पुरस्कार आणि "सुपर फिग्स स्प्रेड" (अंजीर स्प्रेड) या प्रकारासाठी विशेष पारितोषिक मिळाले आहे.
या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात खाद्यपदार्थातील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरंदर हाईलँड्स ही एकमेव भारतीय कंपनी आहे जिने हा पुरस्कार आणि विशेष पारितोषिक मिळवले आहे. जागतिक अन्न उद्योगातील तज्ञ असलेल्या ज्युरींनी दोन्ही उत्पादनांची चाचणी करून हा पुरस्कार जाहिर केला. या पुरस्कारामुळे आता कंपनीची दोन्ही उत्पादने जागतिक स्तरावर होणाऱ्या सर्व एस.आय.ए.एल प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित केली जातील.
वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) या भारतातल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीची सर्वोच्च संस्था यांनी पुरंदर हायलँड्स फार्मर प्रोड्युसर कंपनीला त्यांची उत्पादने मेळ्यात सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले.
जी.आय. टॅग केलेल्या पुरंदर अंजीरपासून बनवलेले जगातील पहिले अंजीर ज्यूस आणि अंजीर स्प्रेड आहे. या कंपनीचे संचालक श्री अतुल कडलग यांनी सतत संशोधन आणि चाचण्यांद्वारे हे विकसित केले असून श्री कडलग हे एमएससी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि पुरंदरच्या राजेवाडी गावातील अंजीर उत्पादक आहेत.
जागतिक व्यासपीठावर या गौरवास्पद कामगिरीमुळे कंपनीचे शेतकरी सदस्य आणि एकूणच अंजीर उत्पादकांना आगामी भविष्यात फायदा होणार आहे.