एटीएम न्यूज नेटवर्क : कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने २०१५ मध्ये विकसित केलेल्या सुपर बासमती या भात बियाण्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया करून 'कोकण सुहास' ही भाताची नवीन सुवासिक जात निर्माण केली आहे.
या भात जातीला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या ५२ व्या संयुक्त कृषी समितीने अकोला येथे झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील हंगामात कोकण सुहास भात बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
बियाण्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया
कोकणातील शेतकरी गेली काही वर्ष चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बासमती भात पिकाच्या लागवडीसाठी भात बियाण्यांची संशोधन केंद्रात विचारणा होत होती. कोकणात खरीप हंगामात भात फुलोऱ्याला येते तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे सुवासिक भाताला कोकणात अपेक्षित वास येत नाही.
भाताचा वास हा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार व तापमान या दोन मुख्य घटकांवर अवलंबून आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिरगाव कृषी संशोधन केंद्राने सुपर बासमती या भात जातीच्या बियाण्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया केली. त्यामधून नवीन सुवासिक जात निर्माण करण्यात यश आले. ही जात विकसित करण्यात डॉ. भरत वाघमोडे, डॉ. विजय दळवी, डॉ. संजय भावे आणि डॉ. नीलेश सोनोने या शास्त्रज्ञांचा मोलाचा सहभाग आहे. सुवासिक भाताची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या नवीन भात वाणाचा चांगलाच फायदा होणार आहे.
शिरगाव भात संशोधन केंद्राच्या जाती
- शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताचे संकरित वाण सह्याद्री-५ आणि १२ या साध्या जाती विकसित केल्या आहेत.
- रत्नागिरी-१, रत्नागिरी- २४, रत्नागिरी-५, रत्नागिरी-६, रत्नागिरी- ७ व रत्नागिरी-८ या जाती प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून पसंतीला उतरल्या आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे.
- रत्नागिरी - ७ ही जात लाल तांदळाची असून, त्यामध्ये लोह, जस्त जास्त प्रमाणात आहे तसेच रत्नागिरी-८ ही जात मध्यम बारीक दाणा असलेली आहे. तिला राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे
कोकण सुहासची वैशिष्ट्ये
- कोकण सुहास ही जात हळवी असून ११५-१२० दिवस असून, ११०-११५ सें.मी. उंच वाढते.
- या जातीचा तांदूळ अतिबारीक व लांबट (बासमती सारखा) असून, सुवासिक आहे. त्याचे उत्पन्न सरासरी ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे येते.
- काही शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे प्रयोग केल्यावर तांदळाची प्रत चांगली असल्याचे निष्कर्ष दिले आहेत.
- पुढील हंगामात या जातीचे बियाणे शिरगाव कृषी संशोधन केंद्रात उपलब्ध होणार आहे.