देशात कोल्ड चेन विकसित होण्यास मोठा वाव : बोरस्ते
एटीएम न्यूज नेटवर्क : देशात कोल्ड स्टोरेज (शीतगृहे) उद्योगासाठीच्या पायाभूत सुविधा अनेक ठिकाणी उभारल्या
जात आहेत. परंतु शेतमालाची वाहतूक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करताना त्याची गुणवत्ता आणि ताजेपणा
टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड चेन विकसित होण्यास मोठा वाव असून, त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत
कोल्ड स्टोरेज उद्योग क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे बोरस्ते अॅग्रो इंडस्ट्रीजचे त्र्यंबकभाऊ बोरस्ते यांनी
व्यक्त केले.
कोल्ड स्टोरेज उद्योग क्षेत्रातील सध्याची स्थिती, आव्हाने आणि संधी या विषयावर ते अॅग्री ट्रे़ड मीडियाशी
बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार व्यक्त केले.
यावर विस्ताराने बोलताना श्री. बोरस्ते म्हणाले, की फळे कोल्ड स्टोरेजसाठी कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध होत
आहेत. कोल्ड स्टोरेजमध्ये माल टिकतो आहे, पण समजा नाशिकहून तो कोलकात्याला पाठवायचा असेल तर कोल्ड
स्टोरेजमधून तिकडे माल नेणाऱ्या साध्या ट्रकचे दर जुळत नाही. ही कोल्ड चेन कायम राहिली तरच माल शून्य
अंशावर टिकून राहील आणि गुणवत्तापूर्ण माल संबंधित ठिकाणी पोहोचेल. त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
त्यासंदर्भात सरकारसुद्धा सकारात्मक असून, त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत.
बोरस्ते अॅग्रो इंडस्ट्रीजबद्दल ते म्हणाले, की फक्त कोल्ड स्टोरेज नव्हे, तर प्री-कूलिंग आणि कोल्ड स्टोरेज
असा युरोपला लागणारा सर्व सेटअप येथे उपलब्ध आहे. हा सेटअप सर्व कंपन्यांकडे आहे. युरोपला लागणारे सर्व
मानक आपल्याकडे पाळले जातात. जसे की, हायजॅनिक पॅकिंग, त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा, आलेल्या
मालासाठी होल्डिंग रूम, पॅक हाउसला ग्रिडींग, शून्य अंशाला रूपांतरीत होणे, तेथून तो कोल्ड स्टोरेजला मेंटेन
होऊन नंतर रेफ्रिजरेटर कंटेनरमधून डिस्पॅच होणे आदी सर्व सुविधा कंपनीमध्ये आहेत. त्यात कामगारांना लागणाऱ्या
सुविधा स्वच्छतागृह, बाथरूम, चेंजिंग रूम, कपाटे, दुपारचे जेवण, यासारख्य सुविधाही आम्ही पुरवितो. देशात
कोठेही नाही इतक्या मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात कोल्डे स्टोरेजसाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या
आहेत.
कोल्ड स्टोरेज उद्योग क्षेत्रातील बदलाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, १९८६ पासून कोल्ड स्टोरेज
क्षेत्रात काम करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे बदल होत गेले, तसे येथेही होत आहेत. अनेक उद्योजक प्रयोग
करत आहेत. हा बदल द्राक्षापुरता मर्यादित राहिला नाही. आता डाळिंब, केळी, टोमॅटो, मिरचीसह इतर
भाजीपाल्यावरही होत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे नाशिक जिल्ह्यात येऊन येथून निर्यात
केला जात आहे. नाशिकमध्ये कामगारांची उपलब्धता आणि त्यांचे कौशल्य ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे
नाशिक जिल्ह्याला निश्चितच फायदा होत आहे.
कोल्ड स्टोरेजमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. त्याबद्दल ते म्हणाले, की एका कोल्ड स्टोरेज उद्योगात
साधारण दोनशे नागरिक काम करतात. नाशिक जिल्ह्यात असे शंभरच्या वर कोल्ड स्टोरेज उद्योग आहेत. याचाच
अर्थ या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला आहे. दुसरे म्हणजे त्याच्याशी संबंधित वाहतूक, पॅकेजिंग
मटेरिअल, त्यांना लागणारे कामगार, हॉटेल्समध्ये काम करणाऱया कामगारांनाही रोजगार मिळाला आहे. यातून
अनेकांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे. त्या त्या हंगामात मोठी आर्थिक उलाढाल होऊन दोन-चार पैसे
प्रत्येकाच्या हातात पडतात. बाराही महिने काम मिळेल अशी व्यवस्था झाली आहे.
तरुण पिढीबद्दल श्री. बोरस्ते आश्वासक दिसले. ते म्हणाले, की तरुण पिढीने प्रक्रिया उद्योगाकडे जाणे आवश्यक आहे.
जसा सह्याद्री उद्योग समुह उभा राहिला, अशाच प्रकारचे छोटे युनिट उभे राहिले, त्यात एका उत्पादनाचे काम जरी
सुरू केले तर मोठ्या संधी आहेत. तरुण पिढीने स्वतःच्या ब्रँडिंगने बाजारात उतरावे, उत्पादनाचे परीक्षण करावे.
त्याला मागणी आली तर स्वतःचे प्रकल्प उभारण्याची मोठी संधी मिळेल. परंतु सुरुवातीलाच मोठा प्रकल्प हाती घेऊ
नये. यामध्ये मोठी जोखीम असल्यामुळे लहान प्रकल्पातून सुरुवात करून बाजारात उतरावे. बाजारात एकदा मागणी
वाढली, की तो उद्योग वाढू शकतो.
सरकारकडून मिळाणाऱ्या मदतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारकडून अनुदान मिळण्याच्या अटी अजूनही
कठोर आहे. त्यामध्ये लवचिकता असणे आवश्यक आहे. कोरोनाकाळानंतर सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत.
परंतु अनुदानाचे प्रमाण तेवढेच आहे. आजच्या परिस्थिती सरकारकडून मिळणारे अनुदान आणि खर्च जुळत नाही.
त्यात त्वरित सुधारणा होणे आवश्यक आहे. कोविडनंतर बाजारात जास्त सुधारणा झालेल्या नाहीत. किमती
वाढल्याचा फटका शेतकरी, उद्योजकांना बसला आहे. सरकारने थोड्याफार प्रमाणात मदत केली तर उद्योजक पुन्हा
उभा राहू शकेल. या वर्षी दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. दर कमी झाले नाही, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोक्याचा
इशारा आहे. निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे द्राक्षाशी संबंधित उद्योग संकटातून चालला आहे. नाशिक
जिल्ह्यात द्राक्षांवर अवलंबून असणाऱ्या उद्योजक आणि कामगारांची संख्या मोठी आहे. या गोष्टीचा विचार होणे
गरजेचे आहे.