एटीएम न्यूज नेटवर्क : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत राष्ट्रीय सेवा मंजुरी समितीने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांची विश्वासार्हता तपासण्यासाठी शासनमान्य प्रयोगशाळा नाशिकमध्ये उभारणीस मान्यता दिली आहे.आता त्यानुसार नाशिक जिल्ह्यात नवीन कीटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा अस्तित्वात येणार आहे.
या कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेसाठी १७ कोटी ८८ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. कीटकनाशकाची तपासणी करण्यासाठी नाशिकच्या शेतकऱ्याना अथवा अधिकाऱ्यांना थेट पुणे येथे जावे लागत होते, अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ खूप जास्त होता त्यामुळे शेतकयांचे नुकसान होत होते. आता नाशिकमध्येच ही प्रयोगशाळा आल्याने वेगवान प्रक्रिया होऊन त्याचा लाभ उत्पादनवाढीसाठी होईल.
शेतीसाठी उत्पादकता कीटकनाशके तपासणी महत्त्वाची ठरते. सद्य:स्थितीत विभागाच्या अखत्यारीत औरंगाबाद, ठाणे, अमरावती, पुणे, अशा चार ठिकाणी कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी याच प्रयोगशाळांचे अहवाल वापरले जातात.
कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेत वर्षभरात २,५०० ते ३,००० नमुन्यांची तपासणी होते. या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. या प्रयोगशाळांना राज्यातील इतर प्रयोगशाळांमध्ये रसायनशास्त्रज्ञ म्हणून तालुका कृषी अधिकारी दर्जाचा अधिकारी देण्यात येतो.त्याच्या मदतीला कृषी अधिकारी दर्जाचे विश्लेषक देण्यात येतात पण विश्लेषकांची टंचाई असल्यामुळे अनेक राज्यांतील प्रकरणे अडकून राहिल्याचे चित्र आहे.
राज्यातील इतर प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची कमतरता असल्याने त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोगशाळा देण्याची मागणी होत होती. कीटनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ किंवा मूळ घटकांचे प्रमाण कमी निघण्याचे प्रकार होत असतात. प्रयोगशाळेत नमुना अप्रमाणित निघाल्यास ४८ तासात माहितीचा अलर्ट अधिकाऱ्यांना जातो. अशी प्रक्रिया वेगवान झाल्यास त्याचा फायदा नाशिकमधील शेतकऱ्यांना होईल असे मत व्यक्त होत आहे.