एटीएम न्यूज नेटवर्क : ‘नको गुलामी, नको चाकरी;विज्ञानातून पिके भाकरी,नशीब स्वत:चे घडवित नेई कर्ता शेतकरी’ ह्या शीर्षक गीतामधूनच ‘कर्ता शेतकरी’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट होतो. शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स व मनोविकास क्षेत्रात काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आय. पी. एच.) यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता रूजावी, म्हणून ह्या संकल्पनेची निर्मिती केली आहे.
मनोविकासतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी व शेतकरी असलेला नाटक, चित्रपट कलाकार राजकुमार तांगडे यांचा सहभाग असलेली ही संवाद मालिका आहे. या उपक्रमांतर्गत ४२ भागांच्या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला हा संवाद समजून घेता येतो. मन म्हणजे काय, विचार-भावना-वर्तनांचा एकामेकांशी असलेला संबंध, विचारांची जाण व भान, माझा मूळ स्वभाव कोणता, निंदा कशी स्वीकारायची, योग्य निर्णय कसे घ्यायचे व निर्णयांची अंमलबजावणी कशी करायची अशा अनेक संकल्पनेभोवती ही मालिका गुंफलेली आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात रोज काहीना काही प्रश्न उभे असतात. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडतो. त्यांच्या मनाला उभारी देणारे, दिशा देणारे काहीच नसते. या सगळ्या परिस्थितीत तो उभा राहावा, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्याच्यामध्ये उद्योजकीय मानसिकता तयार व्हावी, ह्या उद्देशाने सुरू केलेली ही मालिका शेतकऱ्यांना जगण्याचे बळ देणार आहे. सह्याद्री फार्म्स व आय.पी.एच यांच्या यूट्यूब चॅनेलवर ही मालिका सगळ्यांसाठी खुली आहे. दर आठवड्याला या मालिकेचे दोन भाग प्रसारित केले जाणार आहेत. ही संवाद मालिका कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पाहावी, तसेच समाज माध्यमांवरून इतर शेतकरी बांधवापर्यंत ही मालिका पोहचवावी, असे आवाहन सह्याद्री फार्म्स व आय.पी.एच यांनी केले आहे.
जगातील प्रत्येक व्यवसायात प्रश्नांची मालिका असतेच. त्याकडे सकारात्मकतेने पाहिले तर उत्तर सापडते. शेतीमध्येही सकारात्मकतेची आणि व्यावसायिकतेची गरज आहे. त्यासाठी मनाची मशागत करुन आपले मन सुदृढ होण्याची गरज आहे. त्यासाठीच ‘कर्ता शेतकरी’ हा उपक्रम महत्वाचा ठरणारा आहे. यातून विज्ञानाच्या दृष्टीने मनाचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी.
शेती व्यवसायातील कौशल्यविषयक आणि तंत्रविषयक प्रशिक्षणाबरोबर भावनिक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरिखित करणारा हा कार्यक्रम आहे. भारतातील प्रत्येक शेतकरी उद्योजक बनण्याची क्षमता बाळगून आहे. त्याला गरज आहे मार्गदर्शनाची. फक्त शेतकरीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी मोलाचा ठरेल अशी खात्री आहे.
- डॉ.आनंद नाडकर्णी, मनोविकासतज्ज्ञ