एटीएम न्यूज नेटवर्क : आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषीक्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य कृषीथॉन या प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
कृषीथॉनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून भारतभर ओळखले जाते. कृषीथॉनच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रेरित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीथॉनतर्फे कृषीक्षेत्रास प्रोत्साहित करणाऱ्या युवकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी निश्चित झाल्यावर २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनाच्या १७ व्या आवृत्तीमध्ये मान्यवरांच्या हस्ते राज्यातील विविध भागातील निवडक पुरस्कारार्थींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.यामध्ये 'प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष गट), 'प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (महिला गट), 'प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार', 'प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार', 'प्रयोगशील कृषीविस्तार कार्य', ‘गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार’ अशा सहा गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कारांसाठी नामांकन प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. आपला प्रस्ताव पोस्टाद्वारे पाठवू शकतात संपूर्ण नाव, पत्ता व आपण राबविलेल्या शेतीतील अथवा कृषी उद्योग व संशोधन क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, वृत्तपत्रातील कात्रणे आदींसह आपले नामांकन प्रस्ताव ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया हाऊस, वृंदावन लॉन्स समोर, आनंदी नगर, आनंदवल्ली, गंगापूर रोड नाशिक - ४२२०१३ या पत्त्यावर किंवा agritrademedia@gmail.com या ई-मेल वर पाठवावेत.