एटीएम न्यूज नेटवर्क: कृषी क्षेत्रातील मान्यता नसलेल्या विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा निर्णय कृषी क्षेत्रातील संशोधन, शिक्षण समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अपवादात्मक निर्णय घेतल्याचे आयसीएआरने अधिसूचनेद्वारे सांगितले.
आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आयसीएआरकडून दोन केंद्रीय कृषी विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व, पदव्योत्तर आणि पीएच. डी. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या अशा १०० टक्के विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. केंद्रीय विद्यापीठांचे अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांपासून मान्यता नसलेल्या संस्थांमधून शिकविले जातात. अशा अनधिकृत संस्थांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांना मान्यताप्राप्त संस्थेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सामावून घेण्याची अपवादात्मक तरतूद आधीच करण्यात आली आहे. तथापि, अशा विद्यार्थ्यांचा आयसीएआरच्या एयू प्रणालीच्या इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी विचार केला जात नाही. या प्रकरणाची तपासणी करून आयसीएआरने अशा विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे.
आयसीएआर मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयसीएआर कृषी विद्यापीठ प्रणालीचा भाग मानला जाईल. परंतु, हा अपवाद केवळ शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी करण्यात आला असून, तो पुढे वाढवला जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आयसीएआरने पाऊल उचलले आहे. तथापि, प्रवेश घेतलेले असे उमेदवार कोणत्याही आयसीएआरच्या शिष्यवृत्ती किंवा फेलोशिपसाठी पात्र असणार नाहीत.