एटीएम न्यूज नेटवर्क: पाच वर्षांपूर्वी अमेरिकेच्या कृषी विभागाने डाळिंब आयातीवर बंदी घातल्यानंतर निर्यातीच्या वाटा भारतासाठी बंद झाल्या होत्या, परिणामी भारतीय डाळिंब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची एकंदरीत स्थिती होती. आता मात्र पाठपुराव्यानंतर ही निर्यात बंदी उठली आहे. परंतू, यात अमेरिकेतील कृषी मंत्रालयाने अटी, शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांनतर जुलै २७ रोजी अपेडा, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि आय. एन. आय. फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये भारतातून पहिल्या डाळिंब खेपेची निर्यात झाली. हे कामकाज कृषी पणन मंडळाच्या आंतरराष्ट्रीय कृषी निर्यात सुविधा केंद्र येथील विकिरण सुविधा केंद्रावरून प्रायोगिक तत्त्वावर पार पडले.
वर्ष २०१८ पर्यंत डाळिंब व डाळिंब दाणे निर्यात सुरळीत सुरू होती. दरम्यान, डाळिंब दाण्यांमध्ये फळमाशी आढळून आल्याने अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेत भारतीय डाळिंब आयातीवर निर्बंध आणले. परिणामी, गेली पाच वर्षे ही निर्यात पूर्णतः बंद होती.
ती पुन्हा सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या 'अपेडा' व कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून निर्यातबंदी उठविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
अखेर २०२२ मध्ये बंदी उठली. त्यानंतर काही निकष व पद्धती निश्चित झाल्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतर पाच वर्षांनंतर प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा डाळिंब निर्यात सुरू झाली आहे. यामध्ये फळांवर विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे.
याप्रसंगी 'अपेडा'चे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, 'अपेडा'चे सरव्यवस्थापक यू. के. वत्स, पीक संरक्षण सल्लागार जे. पी. सिंग यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला.
तर विकिरण सुविधा केंद्र येथे अपेडाच्या सरव्यवस्थापिका विनिता सुधांशू यांनी डाळिंब कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमेरिकेच्या निरीक्षक श्रीमती डॅग्नी वॅझेक्युझ, प्लांट क्वारंटाइन मुंबई विभागाचे प्रमुख डॉ. ब्रिजेश मिश्रा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड, अपेडाचे उपसर सरव्यवस्थापक नागपाल लोहकरे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, विकिरण सुविधा केंद्र प्रमुख सतीश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल आदी उपस्थित होते.