एटीएम न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने यावर्षी कांद्याचा अतिरिक्त आपत्कालीन (बफर) साठा करायचे ठरवले आहे. यामुळे कांद्याच्या भावात होणारी वाढ रोखता येईल आणि कांदाटंचाईवर मात करता येईल असा सरकारचा होरा आहे. खरेदी केलेला कांदा टिकावा यासाठी त्यावर विकिरण प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाणार आहे.
भारत : कांद्याची निर्यात करणारा मोठा निर्यातदार देश
भारत हा जगभरात कांद्याची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या कांदा उत्पादक राज्यांतून यंदा कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे २०२३-२४मध्ये २५.४७ दशलक्ष कांदा उपलब्ध झाला आहे. कांद्याच्या मागील हंगामाच्या तुलनेत यंदा १६ टक्के घसरण आहे.
विकिरण प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर चालना
या सर्व पार्श्वभूमीवर, कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर होणारा चढउतार आणि त्याचवेळी पुरवठ्यामध्ये येणारा विस्कळितपणा या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी कांदा टिकवण्यावर सरकारने भर द्यायचे ठरवले आहे. यासाठी कांद्यावर मोठ्या प्रमाणावर विकिरण प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले आहे.
कांद्याचा साठा टिकविण्यासाठी विकिरण
मागील वर्षी महाराष्ट्रात १,२०० टन कांद्यावर यशस्वीरीत्या विकिरण प्रक्रिया करण्यात आली. नाफेड व एनसीसीएफ या सरकारी एजन्सींना एकूण पाच लाख टन कांद्याचा साठा करण्यास सांगण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारकडे जमा होणारा कांदा दीर्घकाळ टिकवण्याचे मोठे आव्हान सरकारी यंत्रणांपुढे आहे. यासाठी सोनिपत, ठाणे, नाशिक आणि मुंबई येथील विकिरण प्रक्रियेचा अंदाज सध्या घेतला जात आहे.