एटीएम न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील हवामान हे फलोत्पादनासाठी अनुकूल असल्याने राज्यातील विविध भागात विविध फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष पिकानंतर सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा या तालुक्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
नाशिक जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्र हे डाळिंब फळबाग लागवडीखाली आहे.त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात डाळिंब इस्टेटची स्थापना व्हावी. यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळील निळगव्हाण येथे ५.७८ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब इस्टेट स्थापन करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली असून यासाठी ९८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या डाळिंब इस्टेटमध्ये डाळिंब ज्यूस उत्पादित करणे, डाळिंबाचे दाणे वेगळे करून फ्रोजन करून निर्यातीस चालना देणे, डाळिंब फळ प्रक्रिया साठवण, पॅकेजिंग, मार्केटिंग यांसारख्या अनेक बाबी सहज शक्य होणार आहे. या इस्टेटमुळे डाळींब पिकाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. तसेच साठवणूक व प्रक्रिया सुविधांचा विस्तार केला जाईल. तसेच निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण कलमे विकसित करण्यासाठीही याची मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच जिल्ह्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यांच्या उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठीही याचा उपयोग होईल.
डाळिंब इस्टेट अंतर्गत मोठया प्रमाणात रोगमुक्त व गुणवत्तापूर्ण डाळींब कलमे उत्पादन करणे. निर्यातीसाठी नवीन वाणाची आवश्यकता व निर्यातक्षम उत्पादन करणे. वाजवी दरात यांत्रिकीकरणाची सुविधा निर्माण करणे. डाळींब लागवडीसाठी इंडो इस्रायल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. काढणीपश्चात व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, स्थानिक गरजांनुसार शेतकऱ्यांना डाळींब बहार बाबत कीड व रोग व्यवस्थापन प्रशिक्षण देणे. या बाबी सहज शक्य होणार आहे.
या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे मंत्री दादा भुसे आणि नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.