एटीएम न्यूज नेटवर्क ः गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची उपकंपनी असलेल्या अस्टेक लाइफ सायन्सेस लिमिटेडने नवी मुंबईतील रबाळे येथे नवीन प्रगत संशोधन आणि विकास केंद्र सुरू केले.
‘आदी गोदरेज रासायनिक संशोधन आणि विकास केंद्र’ असे या केंद्राला नाव देण्यात आले आहे. हे केंद्र नवीन प्रयोग, पर्यावरणासाठी शाश्वत विकास आणि सुरक्षित उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑग्रनायझेशन (सीडीएमओ) मध्ये नवोन्मेषक कंपन्यांना सेवा प्रदान करण्यावरही भर देणार आहे.
अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र संश्लेषण प्रयोगशाळा आणि पीक संरक्षण क्षेत्रात नवीन सूत्रीकरण विकसित करण्यासाठी सूत्रीकरण प्रयोगशाळेसह सुसज्ज आहे. या केंद्रामध्ये प्रगत विश्लेषणात्मक साधने, सुरक्षित आणि शाश्वत रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक प्रक्रिया सुरक्षा पायाभूत सुविधादेखील आहेत.
नवीन संशोधन आणि विकास केंद्र कंपनीला अधिक जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणावर टिकाऊ उत्पादनांची नवीन श्रेणी विकसित करण्यास सक्षम करेल. तसेच नैतिकता, सुरक्षितता आणि पर्यावरणाची काळजी यांच्याशी तडजोड न करता ग्राहकांच्या व्यवसायात मूल्य वाढविण्याच्या दिशेने हे केंद्र काम करणार आहे.
केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर जीएव्हीएलचे अध्यक्ष नादिर गोदरेज म्हणाले, की रबाळे येथे सुरू करण्यात आलेल्या संशोधन आणि विकास केंद्राच्या अनावरणामुळे रासायनिक उद्योगातील अफाट क्षमतांचा फायदा घेण्याच्या आमच्या प्रयत्नात अस्टेक लाइफ सायन्सेस लिमिटेड हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. या वेळी जीएव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव, अस्टेक लाइफ सायन्सेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग रॉय उपस्थित होते.
(स्रोत - अॅग्रोपेजेस डॉट कॉम)