एटीएम न्यूज नेटवर्क : यंदाच्या मोसमातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची सर्वाधिक आवक झाली आहे. बाजार समितीत २०० ते ३०० वाहनातून मिरचीची आवक होत आहे. या बाजारात मिरच्यांची मोठी आवक आल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत
आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजारसमितीने व्यक्त केला आहे. सध्या मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत.मागील वर्षी जी मिरची आठ हजारापर्यंत विकली गेली होती त्याच मालाला यावर्षी दोन ते चार हजार पर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिरचीपासून तयार केली जाणाऱ्या पावडरच्या किंमतीत प्रचंड अशी वाढ झाली आहे.