जगातीत जास्तीत जास्त लोक तृणधान्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात मुख्य खाद्यान्न म्हणून करतात. भारतामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, भात, गहू, मका, नाचणी हे तृणधान्य मोठया प्रमाणावर खाद्यान्न म्हणून वापरली जातात. तृणधान्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च हा मुख्य अनघटक असतो आणि त्यापासून मानवी शरीरास सर्वात जास्त ऊर्जा पुरविली जाते. पिष्टमय पदार्थाबरोबरच तृणधान्यांमध्ये प्रथिने, कैल्शियम, लोह आणि बी. कॉम्प्लेक्स जीवनसत्वेसुद्धा मोठया प्रमाणावर असतात. तृणधान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांची साठवण सहजासहजी, कमी खर्चात अधिक कालावधीसाठी करता येते. तृणधान्यामुळे जेवणास मृदू, सौम्य चव निर्माण होते. याच कारणामुळे तृणधान्यांचा वापर आहारात जास्त केला जातो.
तृणधान्याचे आकार, जडणघडणही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही तृणधान्य आकाराने मोठी तर काही अतिशय लहान आहेत. त्यांचे आकारमान गोलाकार, निमुळते, दंडगोल, चपटे, अंडाकृती, किडनीसारखे, अर्धगोल अशा प्रकारचे आहेत. यात ७५ ते ९० टक्के भाग स्टार्चचा असतो. तृणधान्याचे दाणे प्रामुख्याने टरफलांनी, कोंड्याने किंवा जाड आवरणाने, रंगद्रव्याने, मेणाने आच्छादलेले असते. हा भाग खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच पचनासाठी सुलभ नसतो. त्यामुळे ते तृणधान्यापासून वेगळे करणे गरजेचे असते.
तृणधान्य दळण्याच्या प्रक्रियेत तृणधान्यात असणारे कठीण आवरण काढून टाकले जाते. तृणधान्यापासून चांगल्या प्रतीचे पीठ तयार व्हावे म्हणून त्या तृणधान्यास दळण्याअगोदर गरम पाण्याची प्रक्रिया करावी. गरम पाण्याच्या या प्रक्रियेमुळे तृणधान्यापासून कोंडा, बिजांकुर, फोलकटे लवकर व सहजासहजी वेगळे होऊन त्यापासून बनवलेल्या पदार्थांची प्रत आणि प्रमाण वाढते.
ज्वारी प्रक्रिया
भारतात भात आणि गव्हानंतर ज्वारीचा खाद्यान्न म्हणून उपयोग केला जातो. ज्वारीचा उपयोग विविध प्रकारचे खाद्यपदार्थ निर्मितीसाठी केला जातो. ज्वारीच्या धान्याबरोबरच त्याच्या ताटांचा, कडब्याचा उपयोग ओला किंवा वाळलेला असतांना पशुखाद्य म्हणून प्रामुख्याने करतात. ज्वारीच्या काही वाणात रस व साखरेचे प्रमाण अधिक आहे. अशा वाणांचा उपयोग सायरप तयार करण्यासाठी केला जातो. ज्वारीत स्टार्च महत्त्वाचा घटक आहे. तो शुद्ध स्वरूपात वेगळा करून त्याचा उपयोग आंबविण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी व त्यापासून अल्कोहोल व इतर रासायनिक द्रावणे तयार करतात. ज्वारीवर प्रक्रिया करताना प्रथम स्वच्छता करणे, कोंडा काढणे, कांडणे आणि शेवटी पिठामध्ये रुपांतर करणे या नंतरच्या प्रक्रियेमध्ये पिठाचे किंवा कच्च्या मालाचे रूपांतर पदार्थामध्ये पक्क्या मालामध्ये केले जाते.
मानवी आहारात तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण पाहिजे ते ज्वारीच्या सेवनाने पुरेपूर मिळते. कावीळ झालेल्या रोग्यास ज्वारीचा आहार उपयुक्त ठरतो. मानवाचा लठ्ठपणा व मधुमेह कमी करण्यास ज्वारीचा उपयोग होतो. हृदयाचे विविध विकार ज्वारीने कमी होतात. भुक वारंवार लागत नाही. पोटाचे विकार कमी होतात. आजारी मानवास दूध ज्वारी भाकरीचा आहार देण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. अशी या बहुउपयोगी ज्वारीचे विविध अन्नपदार्थ बनवल्यास तरुणांना या क्षेत्रात मोठा रोजगार प्राप्त होऊ शकतो.
बाजरी प्रक्रिया
बाजरी प्रामुख्याने खाद्यान्न म्हणून वापरतात. बाजरीवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही. काही प्रमाणात पॉलीश करून हिरवा रंग घालवून पांढरा केला जातो. बाजरीपासून लाह्या तयार करण्यासाठी परलिंग केले जाते. आणि नंतर लाह्या तयार केल्या जातात. तसेच परलिंग केलेली बाजरी शिजवून अनेक पदार्थ तयार केले जातात. बाजरीपासून भाकरी, पोरजी यासारखे पदार्थ तयार करतात.
या धान्यास माल्टींगची प्रक्रिया करून त्यापासून पेयही तयार करतात. बाजरीचे पीठ साधारणपणे ४-५ दिवसांत कडसर होत असल्यामुळे पुष्कळ लोक बाजरी खाणे टाळतात. बाजरीचे धान्य फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात १५ ते २० सेकंद बुडविल्यास त्यातील पीठ कडू करणारे घटक निष्क्रीय होतात. अशा प्रक्रिया केलेल्या धान्यापासून तयार केलेले पीठ महिनाभरापर्यंत चांगल्या स्थितीत साठवता येते.
अशाप्रकारे तृणधान्यांचा उपयोग मानवी आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. सध्या तर या तृणधान्यांच्या पदार्थाना, उपपदार्थाना भरपूर मागणी आहे. खाद्यान्न बरोबरच यापासून विविध पदार्थ बनवल्यास फार मोठी बाजारपेठ या पदार्थांना उपलब्ध होईल.