एटीएम न्यूज नेटवर्क : नेदरलँड्सला सागरी मार्गाने ताज्या केळीची चाचणी शिपमेंट यशस्वीरित्या निर्यात केल्यामुळे भारताने आता केळी फळाची निर्यात पुढील पाच वर्षांत एक अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या भारतातून बहुतेक फळांची निर्यात हवाई मार्गाने होत आहे. कारण फळांचे प्रमाण कमी आणि पिकण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. निर्यातीचे प्रमाण वाढवण्यासाठी भारत केळी, आंबा, डाळिंब आणि जॅकफ्रूट यांसारखी ताजी फळे आणि भाज्यांसाठी सागरी मार्गांद्वारे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी प्रोटोकॉल विकसित करत आहे.
या प्रोटोकॉलमध्ये प्रवासाची वेळ समजून घेणे, शास्त्रोक्त पद्धतीने मालाची पिकवण्याची पद्धत समजून घेणे, विशिष्ट वेळी कापणी करणे आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे या गोष्टी समाविष्ट आहे. वेगवेगळ्या फळे आणि भाज्यांसाठी हे प्रोटोकॉल वेगवेगळे असतील.
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA), इतर फळांबरोबर केळीसाठी हे प्रोटोकॉल विकसित केले आहेत. अपेडा ही वाणिज्य मंत्रालयाची एक शाखा आहे. शिपमेंटची यशस्वी चाचणी केल्यानंतर भारताने पुढील पाच वर्षांत एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची केळी निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामुळे समुद्र मार्गाने विविध बाजारपेठेचे दरवाजे उघडले जाणार असल्याचे अधिका-याने सांगितले.
चाचणी शिपमेंट ही ५ डिसेंबर रोजी रॉटरडॅम, नेदरलँड्स येथे पोहोचली असून बारामती, महाराष्ट्र येथून माल पाठवण्यात आला. भारतातून केळी निर्यात मध्य पूर्वेपर्यंत पसरलेली आहेत. यूएस, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड्स, यूके आणि फ्रान्स यासारख्या प्रमुख देशात केळी निर्यातीची संभाव्य संधी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश असून जागतिक बाजारपेठेत भारताचा निर्यातीचा वाटा सध्या केवळ एक टक्का आहे. भारताचा जागतिक केळी उत्पादनात २६.४५ टक्के वाटा असून ३५.३६ दशलक्ष मेट्रिक टन इतका आहे.
२०२२-२३ मध्ये भारताने १७६ दशलक्ष डॉलर किमतीची केळी निर्यात केली. मुख्य केळी उत्पादक राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश होतो. कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ प्रा. चिरला शंकर राव यांनी सांगितले की, आंध्रप्रदेशातून केळीची मोठी निर्यात करण्याची क्षमता आहे.
बी टू बी प्रदर्शने आणि इतर फळांसाठी सागरी प्रोटोकॉलचा विकास यासह अपेडाचे सततचे प्रयत्न, भारताच्या कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन अधोरेखित करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.