एटीएम न्यूज नेटवर्क ः एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) वर शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवणे आवश्यक असून, केंद्र सरकार उद्योगाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन खत आणि रसायन मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले. एसएसपी उद्योगांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने
फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय) ने नवी दिल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांकडून एसएसपी खताचा वापर कमी झाला असून, एसएसपी खतनिर्मितीचे कारखाने क्षमतेहून कमी चालू आहेत. नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका यांसारख्या शेजारील देशांमध्ये एसएसपी निर्यात करण्याच्या शक्यतांचाही शोध एसएसपी उद्योगाकडून घेतला जात आहे. कार्यशाळेत देशातील ५० एसएसपी कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणारे ८० प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत सिंगल सुपर फॉस्फेटची गुणवत्ता ढासळून खताची पत घसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. शेतकरी डीएपी खताकडे वळले असून, एसएसपीचा वापर करण्यास तयार नाहीत. नोव्हेंबर 2022 पर्यंत एसएसपी खताच्या विक्रीत 42.66 लाख टनांवरून 38.70 लाख टन इतकी घसरण झाली आहे. त्याचवेळी डीएपी खत विक्री 70.47 लाख टनांवरून 18.53% वाढून 83.53 लाख टन झाली आहे.
डॉ. मांडविया म्हणाले, एसएसपी उद्योगाला एफसीओ वैशिष्ट्यांनुसार चांगल्या दर्जाच्या उत्पादनांचा पुरवठा सुनिश्चित करावा लागतो. गुणवत्तेची खात्री करण्यासाठी सर्व एसएसपी उत्पादन कंपन्यांनी परिसरामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा (एनएबीएल मान्यताप्राप्त) स्थापन करणे आवश्यक आहे. अंतिम उत्पादनामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची दुप्पट खात्री करण्यासाठी सर्व तपासण्या करायला हव्या. याव्यतिरिक्त कंपन्यांनी उत्पादनाचे चांगले विपणन आणि मागणी निर्माण करण्यासाठी काम करायला हवे.
डॉ. मांडविया पुढे म्हणाले, स्थानिक तसेच निर्यातीसाठी एसएसपीचे उत्पादन वाढवण्यासाठी विशाखापट्टणम (पूर्व किनारा) आणि दहेज (पश्चिम किनारा) येथे प्रत्येकी एक एसएसपी पार्क स्थापन करण्याची सूचनाही डॉ. मांडविया यांनी केली. उद्योगांनी प्रस्ताव घेऊन पुढे यावे. त्यासाठी खत विभागाने त्यांना पूर्ण सहकार्य करावे. यामुळे कच्च्या मालाची स्पर्धात्मक किमतीत खरेदी होण्यास मदत होईल. एकाच ठिकाणी चांगल्या प्रकारे देखरेख व नियंत्रण राहण्यास मदत होईल.
एसएसपीच का?
सुमारे 1 टन डीएपी खताने मातीला 180 किलो 'एन' आणि 460 किलो 'पी' मिळते. यामुळे माती सल्फर, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियमपासून वंचित राहते. तथापि 0.4 टन युरिया आणि 2.87 टन एसएसपी खत वापरल्यास 184 किलो 'एन', 460 किलो 'पी' आणि 316 किलो आवश्यक सल्फर मिळते. हे संयोजन 604 किलो कॅल्शियम देखील देते. युरिया आणि एसएसपी यांचे मिश्रण 20% स्वस्त होऊन सरकारवरील अनुदानाचा बोजा कमी होईल.