एटीएम न्यूज नेटवर्क : भारतातून बांग्लादेशात होणारी निर्यात किमान ७५ टक्के आहे. भारत आयातीपेक्षा बांगलादेशला निर्यात जास्त करतो. बांगलादेशातील बदललेल्या राजकीय घडामोडीचा राज्यासह देशातील कांदा निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यांसह देशभरातून बांगलादेशला होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. भारताच्या एकूण तेलबिया पेंड निर्यातीपैकी तब्बल १८ टक्के निर्यात बांगलादेशला होते.ती निर्यातही आता पूर्णपणे थांबली आहे.
कांद्याचे शेकडो ट्रक भारत- बांगलादेश सीमेवर अडकून
बांगलादेशामध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे येथे तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. तेथील लोक भारतात घुसतील या शक्यतेने भारताच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिकमधून बांगलादेशला कांदा घेऊन जाणारे ५० ते ६० ट्रक सीमेवर अडकले आहेत.
शेतमाल निर्यातीवर परिणाम
बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, विशिष्ट प्रजातीचे मासे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल तसेच खाद्यान्न आयात करतात नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष आणि कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते. सध्या द्राक्षाचा हंगाम नसला तरी कांद्याची निर्यात मात्र सुरु आहे.
केंद्र सरकारने मार्च महिन्यात व्यापाऱ्यांना निर्यात करण्याची परवानगी दिली होती त्यानुसार बांगलादेशला ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली होती. परंतु सीमा बंद केली असल्याने कांद्याचे शेकडो ट्रक भारत- बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत.
वातानुकूलित वाहनाद्वारे चार टन विदेशी भाजीपाला केला निर्यात
नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील ग्रीन बेरी एक्झॉटिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने २६ जुलैला बांगलादेशामध्ये वातानुकूलित वाहनाद्वारे चार टन विदेशी भाजीपाला निर्यात केला आहे. यात ब्रोकोली, आईसबर्ग, रेड कॅबेज, चायना कॅबेज, झुकिनी या भाजीपाल्याचा समावेश आहे.
ग्रीन बेरी कंपनीला आणखी एक कंटेनर निर्यात करायचा होता पण बांगलादेशला उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे तो पाठवता आला नसल्याचे ग्रीन बेरी एक्झॉटिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अमित गिते यांनी सांगितले