एटीएम न्यूज नेटवर्क ः हवामानातील चढ-उतारांचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत असतो. यंदा फेब्रुवारीतील वाढते तापमान, मार्चमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वारे यामुळे भारतातील शेतकरी विशेषतः गहू उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजित गव्हाच्या उत्पादनाच्या आकडेवारीत बदल झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे कमी उत्पादन होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे.
गहू उत्पादन अंदाज 2022-23
या वर्षी 2022-23 मध्ये देशात 343 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. दुसऱ्या आगाऊ उत्पादन अंदाजानुसार 111.2 दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित आहे. परंतु तज्ज्ञ आणि अहवालानुसार जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी गव्हाचे दाणे फुटले किंवा काळे पडले आहेत. ठिकठिकाणी धान्य कमी झाल्याच्याही बातम्या आहेत. केंद्राने असेही म्हटले होते की प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 8-10 टक्के गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु उशिरा पेरणी झालेल्या भागात चांगले उत्पादन मिळण्याच्या संभाव्यतेमुळे हे कमी होऊ शकते.
उच्च आर्द्रता, कमी दर
मध्य प्रदेशात नवीन गव्हाची आवक मार्चमध्येच सुरू झाली. पण बाजारात येणाऱ्या पिकात ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे व्यापारी व बड्या कंपन्या खरेदी करणे टाळत आहेत. व्यापारी शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करत असले तरी ते बाजार समितीपेक्षा कमी भाव देत आहेत. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, मध्य प्रदेशात गहू खरेदीसाठी गुणवत्ता मानके शिथिल करण्यात आली आहेत. पंजाब आणि हरियाणामध्येही लवकरच याचा विचार केला जाईल.
भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य संस्थांनी अनेक राज्यांमध्ये खरेदी सुरू केली आहे. मध्य प्रदेशात, मार्चमध्ये वेगवेगळ्या वेळी गारपीट आणि पावसाने राज्याच्या बहुतांश भागात पिकांवर वाईट परिणाम केला. राज्यातील 25 हून अधिक जिल्ह्यांतील 70,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात आले, त्यामुळे गहू, हरभरा आणि मोहरी पिकांचे मोठे नुकसान झाले.
देशात हवामान स्वच्छ राहिल्यास आणि पाऊस न पडल्यास गव्हाचे उत्पादन 105 दशलक्ष टनांच्या जवळपास राहू शकते, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे. परंतु हवामान बिघडल्यास उत्पादन 100 दशलक्ष टनांच्या खाली जाऊ शकते. सरकारच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार यावर्षी ११२.२ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये तापमानात विक्रमी वाढ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाचे उत्पादन घटले होते. सरकारी अंदाजानुसार तेव्हा 10.77 कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले होते. पण उत्पादन केवळ 97 दशलक्ष टनांपर्यंत घसरल्याचे बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे.
कमी उत्पादन आणि किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त किंमतीमुळे शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्या आणि व्यापाऱ्यांना जास्त दराने गहू विकण्यास प्राधान्य दिल्याने गेल्या वर्षी सरकारी खरेदीला फटका बसला होता. गेल्या वर्षी सरकारी केंद्रांवर केवळ 1.88 कोटी टन गहू विकला गेला होता, जो 2021-22 मधील 4.33 कोटी टन गव्हाच्या तुलनेत 56.58 टक्के कमी होता. यावर्षी ३.४१ कोटी टन गहू खरेदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
बाजारातील किंमतीतील फरक
सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री करण्याची घोषणा करण्यापूर्वी जानेवारीच्या मध्यात गव्हाचे भाव 3,200 रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 30 लाख टन गव्हाच्या खुल्या विक्रीच्या निर्णयानंतर भाव घसरण्यास सुरुवात झाली.
फेब्रुवारीमध्ये सरकारने आणखी 2 दशलक्ष टन गहू विकण्याचा निर्णय घेतला आणि त्याची किंमत 2,125 रुपये प्रति क्विंटल केली. 15 मार्चपर्यंत सरकारने 33.77 लाख टन गहू खुल्या बाजारात विकला आहे. या सर्व निर्णयांचा गव्हाच्या दरावर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाचे सध्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहेत.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय गव्हाच्या किमती 450 प्रतिटन डॉलरवरून आता सुमारे 280 डॉलरवर पोहोचल्या. परिणामी गव्हाची किंमत किमान आधारभूत किमतीच्या खाली राहिली आहे. म्हणजे अनेक राज्यांमध्ये 1,800 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल, एमएसपी 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे. हवामान आणखी बिघडल्यास गव्हाचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊन भाव वाढू शकतात.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)