एटीएम न्यूज नेटवर्क : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला व शासनाच्या कृषी विभागातर्फे शिवारफेरीचा प्रारंभ २० सप्टेंबरला झाला. या शिवारफेरीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अमोल मिटकरी, आ.. किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणीचे वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक रावसाहेब भागडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी सहसंचालक किसन मुळे, शंकर तोटावार, डॉ. हरिहर कौसडीकर हे उपस्थित होते.
या शिवारफेरीचे आयोजन विद्यापीठाच्या २० एकर प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे. या ठिकाणी पीक प्रात्यक्षिके साकारण्यात आली आहेत. २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत या तीनही दिवस संशोधन प्रक्षेत्र प्रत्यक्ष अवलोकनासाठी खुले राहणार असून या ठिकाणी पीकनिहाय संशोधन, अत्याधुनिक शेतीतंत्र आत्मसात करता येणार आहे. यावेळी शेतकरी शाश्रज्ञ सुसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या शिवार फेरीत आपणाला तेलबिया पिके, नगदी पिके, डाळवर्गीय पिके, तृणधान्य पिके, फळपिके, भाजीपाला पिके, शोभिवंत फुलपिके, सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी, कृषी यंत्रे, शेती अवजारे, चारा पिके, गोसंवर्धन, व्यावसायिक शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, एकात्मिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प, सुगंधी व औषधी वनस्पती उद्यान,इ. प्रत्यक्ष अवलोकन करण्यात येणार आहे.
या शिवारफेरीचे अजून एक वैशिट्य म्हणजे गहू संशोधनाचे प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी २५ एकर प्रक्षेत्रावर खरीप पिकांच्या ३०० विविध जातीचे, तंत्रज्ञानाचे जीवंत प्रात्यक्षिक साकारण्यात आले असून विविध पिकाच्या जाती, लागवड तंत्रज्ञान पाहावयास उपलब्ध आहे. कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवारफेरीचे आयोजन केले जाते.