एटीएम न्यूज नेटवर्क ः नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने एक पाऊल पुढे टाकत आता खाजगी कृषी बाजाराची स्थापना केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी व सक्षम अशी बाजार व्यवस्था निर्माण झाली असून, खाजगी कृषी बाजारासाठी परवाना मिळवणारी सह्याद्री ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक संस्था आहे.
राज्यातील खाजगी बाजार परवानाधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सहयाद्री फॉर्मर प्रोडयूसर कंपनी लि. ने "सहयाद्री फार्मर्स प्रायव्हेट अॅग्रीकल्चर मार्केट लि. मोहाडी, दिडोरी, नाशिक" या नावाने खाजगी बाजार परवाना प्राप्त केला आहे. या द्राक्ष हंगामात कंपनी काम करण्यासाठी सज्ज आहे. या संदर्भातील चाचण्या जानेवारीच्या मध्यात सुरू होतील आणि एप्रिलच्या मध्यात हंगाम संपेपर्यंत सुरळीतपणे काम सुरू होईल.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विकास व विनियमन अधिनियम १९६३ मध्ये २० सुधारणा होऊन थेट पणन खाजगी बाजार एकल परवाना देण्याबाबत तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांकडील कृषी मालाची थेट खरेदी करण्यासाठी विविध व्यक्ती/कंपन्या/संस्था, शेतकरी, शेतकरी गट इत्यादींना पणन संचालनालयामार्फत थेट परवाने देण्यात येतात. सद्यस्थितीत राज्यात १४६० थेट पणन परवानाधारक कार्यरत असून, सन २०२१-२२ मध्ये सदर परवानाधारकांची उलाढाल १३६८ कोटी रुपये इतकी आहे.
एक किंवा अधिक बाजार आवारामध्ये शेतमालाची थेट खरेदी करता यावी यासाठी एकल परवाना देण्यात येतात. सदर परवाना कालावधी १ वर्षाचा असून, तो दरवर्षी नूतनीकरण करता येतो. सन २०२४-२५ मधील सदर परवानाधारकाची संख्या ३३ असून, त्यांची उलाढाल ५,५६,३९७ कोटी रुपये इतकी आहे.
तसेच पणन व्यवस्थेत बदल करण्यासाठी खाजगी निधीची गुंतवणूक करणे व शेतकऱ्यांना पर्यायी बाजार व्यवस्था उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून खाजगी बाजार स्थापन करण्यासाठी परवाने देण्यात येतात. सद्यस्थितीत राज्यात ७३ खाजगी बाजार परवानाधारक आहेत. सन २०२१-२२ मधील त्यांची उलाढाल ४,५५७.८४ कोटी रुपये इतकी आहे.
'सह्याद्री'ची घौडदौड
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना १२ वर्षांपूर्वी झाली. या कंपनीची वार्षिक उलाढाल मार्च २०२२ अखेर ७८४ कोटी रुपये इतकी आहे. ही कंपनी द्राक्ष उत्पादन हाताळणी व निर्यात करणारी तसेच नंतर टोमॅटोवर प्रक्रिया करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीने द्राक्ष उत्पादन व निर्यातीत जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विविध पीक उत्पादन घेणारे १७ हजार शेतकरी कंपनीशी थेट जोडलेले आहेत. द्राक्षासह टामॅटो, कांदा, डाळिंब, केळी, फुलशेती, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, कापूस या शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होण्यासाठीही कंपनीने पुढाकार घेतला आहे.