एटीएम न्यूज नेटवर्क ; वाहन निर्मितीत आघाडीची फोर्स मोटर्स लिमिटेडने विद्यमान चालू वर्षांपासून कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमधून ट्रॅक्टरचे उत्पादन आणि त्यासंबंधित सर्व ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिच्या उत्पादन तर्कसंगत कार्यक्रमांतर्गत मुख्यतः प्रीमियम श्रेणीतील आणि उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने आणि विशेष वाहनांची निर्मिती यामध्ये प्रवासी आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनांचा समावेश असणाऱ्या या मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ट्रॅक्टरच्या विक्रीचा एकूण महसूल १८२.५३ कोटी रुपये होता, जो त्याच आर्थिक वर्षातील कंपनीच्या एकूण महसुलाच्या केवळ ३.६६ टक्के आहे व ३१ मार्च २०२३ पर्यंत युनिटच्या मालमत्तेचा निव्वळ ब्लॉक १२.२९ कोटी असल्याचे फोर्स मोटर्सने सांगितले.
फोर्स मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपनी आहे. पुण्यात मुख्यालय असलेली ही कंपनी १९५८ पासून २००५ पर्यंत बजाज टेम्पो मोटर्स म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी टेम्पो, मॅटाडोर, मिनीडोर आणि ट्रॅव्हलर सारख्या ब्रँडसाठी ओळखली जाते. गेल्या पाच दशकांमध्ये या कंपनीने डाइमलर,झेड एफ, बॉश, फोक्सवागन सारख्या जागतिक उत्पादकांशी भागीदारी केली आहे.
फोर्स मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या वाहनांचे प्रत्येक भाग तयार करते. कंपनीच्या विक्रेत्यांचे जाळे पूर्ण भारतात आहे. याशिवाय ही कंपनी आफ्रिका, लॅटिन अमेरिका, सार्क आणि आसियान देश, आखाती आणि जर्मनीमधील विविध देशांमध्ये निर्यात करते. फॉर्च्युन इंडिया ५०० कंपन्यांच्या २०२च्या यादीत फोर्स मोटर्स ३५९व्या क्रमांकावर आहे.