एटीएम न्यूज नेटवर्क : कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, कृषी पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. यंदा २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कल जवळ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक साहिल संजय न्याहारकर यांनी दिली.
१७ व्या शृंखलेतील कृषी प्रदर्शनाची तयारी सुरू
विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला देशात लौकिक प्राप्त झाला आहे. अशा या कृषिवलांना कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती करून देण्यासाठी १९९८ पासून कृषीथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेतील १७ व्या कृषी प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीच्या उद्योगांची कृषी उत्पादनांना व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
विविध विषयावर प्रात्यक्षिके,कार्यशाळा इ. उपक्रम
या प्रदर्शनात शेतीची यंत्रे आणि उपकरणे, पीक संरक्षण आणि पोषण, अचूक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, कृषी रसायने आणि खते, बियाण्याच्या जाती आणि आनुवंशिकी, सिंचन आणि जल व्यवस्थापन प्रणाली, कृषी व्यवसाय आणि वित्त, व्हर्टिकल शेतीचे तंत्र, कृषी क्षेत्रातील ड्रोन ऍप्लिकेशन्स, मातीचे आरोग्य आणि संवर्धन, स्मार्ट सिंचन उपाय, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती पद्धती, कृषी व्यवसाय स्टार्ट-अप धोरणे, हवामानास अनुकूल पीक वाण अशा विषयावर उत्पादन प्रात्यक्षिके, कार्यशाळा इ. उपक्रम कृषीथॉनमध्ये होणार आहे.
प्रदर्शनात स्टॉलधारकांचा सहभाग
कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, कृषी अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे.
स्टॉल बुकिंगचे आवाहन
या वर्षी प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्य, देश आणि परदेशातील नामांकित ३०० हून अधिक कंपन्या व संस्था सहभागी होणार आहेत. दरवर्षी जवळपास दीड लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. शेतीच्या भविष्याला आकार देणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनाचा एक भाग होऊन आजच आपला स्टॉल बुक करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.