एटीएम न्यूज नेटवर्क : येथील गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान नाबार्ड एफपीओ तरंगमेळा व शेतकरी उत्पादक कंपनीनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच झाले. हे प्रदर्शन लघु कृषक व्यापार संघ (एसएफएसी),ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.
नाबार्ड व तरंगमेळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालिका लिना बनसोड यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर सी.बी.सिंघ, नाबार्डचे उप महाप्रबंधक अनिल रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर भिवा लवाटे, विपणन अधिकारी गुलजार सोनवणे, एसएफएसीचे प्रकल्प समन्वयक गणेश साहू,नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अमोल लोहकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ३ ऑगस्ट रोजी स. १० ते ११ यादरम्यान नोंदणी झाली असून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ४० स्टॉलधारक सहभागी झाले होते. दुपारी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बँक संवाद याविषयी बँक ऑफ महाराष्ट्राचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर भिवा लवाटे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. त्यानंतर विपणन अधिकारी गुलजार सोनवणे यांच्या हस्ते योजनांचे सादरीकरण या विषयावर तर कृषक मित्र ऍग्रो सर्विसेसचे संजय जोशी यांच्यातर्फे एग्री स्टार्टअप सादरीकरण या विषयावर चर्चासत्र पार पडले.
तरंग मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा, आव्हाने आणि अनुभव या विषयावर सावित्रीबाई फुले शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा काळे, जनशांती शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जेउघाले यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर कंपनी कायद्यासंदर्भात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुपालनाबाबत मार्गदर्शन या विषयावर कंपनी सचिव अनघा केतकर यांनी मार्गदर्शन केले.
तरंग मेळाव्याच्या समारोपाच्या दिवशी दुपारी "शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कृषी विभागाच्या योजना" या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांचे व्याख्यान झाले. अर्थ वित्त सल्लागार गणेश शिंदे यांचे " एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एआयएफ)" या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी सहभागी स्टॉलधारकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रदर्शनात भेट देणारे प्रेक्षक, स्टॉलधारक यांच्यामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. अशा भाग्यवान व्यक्तींना बक्षिसे देण्यात आली. हे बक्षिसे रेडिओ मिर्ची यांनी प्रायोजित केली होती.