एटीएम न्यूज नेटवर्क ः देशात पाच नवीन खत संयंत्रे सुरू झाल्याने युरियाच्या देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. यापैकी चार संयंत्र यापूर्वीच कार्यरत झाले आहेत, तर तालचेर येथील कोळसा वायूकरण संयंत्र ऑक्टोबर 2024 पर्यंत कार्यान्वित होईल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी एफसीआयएल तालचेर संयंत्रामधील कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेड (टीएफएल), गेल इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ), कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एफसीआयएल) यांच्या मदतीने तालचेर संयंत्राचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.
डॉ. मांडविया म्हणाले, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. खत क्षेत्र हे त्यापैकी एक आहे. कोळसा वायूकरणसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोळशासारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करून भारत युरिया क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. या दृष्टीकोनातून, भारत सरकार तालचेर संयंत्राच्या प्रगतीचा आढावा घेत असून, हा भारतातील सर्वात मोठा आणि पहिला कोळसा वायूकरण युरिया संयंत्र असेल.
एफसीआयएलच्या पूर्वीच्या तालचेर संयंत्राला 12.7 लाख मेट्रिक टन प्रतिवर्ष स्थापित क्षमतेसह नवीन कोळसा वायूकरण आधारित युरिया संयंत्राचे पुनरुज्जीवन करण्याचे आदेश टीएफएलला देण्यात आले आहेत. हा प्रकल्प कोळशाच्या वायूकरणाला चालना देत असून, 2030 पर्यंत 100 मेट्रिक टन कोळशाचे वायूकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही मदत करेल. या प्रकल्पामुळे ओडिशाच्या आणि सर्वसाधारणपणे पूर्व भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, भारताचे आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल पडणार आहे.
कोळसा वायू रूपात मिळविणे हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण कोळशाच्या किमती अस्थिर आहेत. देशांतर्गत कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तालचेर संयंत्र युरियाच्या उत्पादनासाठी आयातित नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व कमी करेल. यामुळे नैसर्गिक वायू आयात बिलात कपात होईल. तालचेर संयंत्रामध्ये स्वीकारलेली वायूकरण प्रक्रिया थेट कोळशावर चालणाऱ्या प्रक्रियेच्या तुलनेत अधिक पर्यावरणास अनुकूल आहे.
देशांतर्गत उत्पादित युरियाची उपलब्धता वाढवण्यासाठी एफसीआयएल आणि एचएफसीएलच्या बंद संयंत्रांचे पुनरुज्जीवन हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम होता. एफसीआयएल/एचएफसीएलचे पाचही संयंत्र सुरू झाल्याने देशातील 63.5 लाख मेट्रिक टन देशी युरिया उत्पादन क्षमता वाढेल. पाचपैकी रामागुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी या चार प्रकल्पांमध्ये यापूर्वीच युरियाचे उत्पादन सुरू झाले आहे. तालचेर प्रकल्पातील खत निर्मिती प्रक्रिया सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.