एटीएम न्यूज नेटवर्क ः इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) ने कॅलिफोर्निया येथील कपूर एंटरप्रायझेस इंकसोबत नॅनो द्रव युरिया निर्यात करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा करार झाला आहे.
इफकोने आता भारतामध्ये शोधून काढलेल्या आणि स्वदेशी बनावटीच्या जगातील पहिल्या नॅनो युरियाची अमेरिकेला निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील इफको आणि कपूर एंटरप्रायझेस इंक यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असे इफकोने एका निवेदनात म्हटले आहे.
सध्या इफको 25 हून अधिक देशांमध्ये नॅनो द्रव युरियाच्या 5 लाखांहून अधिक बाटल्या निर्यात करत आहे. इफकोने जून 2021 मध्ये जगातील पहिले नॅनो युरिया खताचे, तर एप्रिल 2023 मध्ये नॅनो डीएपीचे अनावरण केले होते.
नॅनो युरियाच्या 5 बाटल्या या एका वृक्षारोपणाच्या समान आहे, असे ई आणि वाय च्या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या दुसर्या अहवालात असे म्हटले आहे, की "प्रादेशिक पावसावर आधारित सखल प्रदेश भात संशोधन केंद्र, गेरुआ (आसाम), आयआरआरआय- आयएसएआरसी चाचण्या (खरीप 2021) यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जर भारतातील 50% भात लागवड क्षेत्र नॅनो युरियाअंतर्गत आणले गेले, तर त्यामुळे हरित वायू उत्सर्जन 4.6 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य कमी होईल.
नॅनो युरिया द्रवाची 500 मिली बाटली किमान एक पिशवी पारंपरिक युरियाची जागा घेईल. माल चढविणे-उतरविणे आणि गोदामाच्या किमती लक्षणीयरीत्या कमी करू शकते. इफकोने भारतात नॅनो युरिया द्रवाच्या 5.7 कोटींहून अधिक बाटल्या विक्री केल्या आहेत. शास्वत शेती करण्यासाठी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही दोन्ही खते महत्त्वाची आहेत.