एटीएम न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने २०२४-२५ च्या खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयात एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
एमएसपी वाढवण्यास मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला.
केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयात एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.
पिकाच्या किमान आधारभूत किंमती
तांदळाच्या नवीन एमएसपी २,३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे जी मागील एमएसपीपेक्षा ११७ रुपये अधिक आहे. तूर डाळीसाठी ७५५० रुपये प्रति क्विंटल अशी एमएसपी ठरवण्यात आली आहे. गेल्यावर्षीचा हा दर ५५० रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे.
उडीदाच्या डाळीसाठी ७४०० रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. गेल्यावर्षापेक्षा यावर्षाचा एमएसपी हा ४५० रुपयांनी वाढला आहे.
मूग डाळीसाठी प्रति क्विंटल ८६८२ रुपये असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी मूग डाळीच्या भावात प्रति क्विंटल १२४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
शेंगदाण्यासाठी एमएसपी ६७८३ रुपये प्रति क्विंटल इतका ठरवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रति क्विंटल ४०६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कापसाचा नवीन एमएसपी ७,१२१ असेल. कापसाच्या लांब धागा प्रकारासाठी नवीन एमएसपी ७,५२१ रुपये असेल जो पूर्वीपेक्षा ५०१ रुपये अधिक आहे
ज्वारीसाठी ३३७१ रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रति क्विंटल १९१ रुपयांनी जास्त आहे.
केंद्र सरकारने बाजरीसाठी २६२५ रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रत्येक क्विंटलमागे १२५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
मका पिकासाठी २२२५ रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवला आहे. हा दर गेल्यावर्षापेक्षा प्रत्येक क्विंटलमागे १३५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
नाचणीचा एमएसपी ४२९० रुपये प्रति क्विंटल ठरण्यात आला आहे.तीळचा एमएसपी ८७१७ रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे.
सूर्यफूलासाठी ७२३० रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी ठरवण्यात आला आहे. एमएसपी वाढल्याने सरकारचा खर्च सुमारे २ लाख कोटी रुपयांनी वाढेल.