एटीएम न्यूज नेटवर्क : युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (युएनसीसीडी) तर्फे देण्यात येणारा 'लँड हिरो' हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान पुणे जिल्हा, शिरूर तालुक्यातील धामारी गावचे सिद्धेश साकोरे यांना प्रदान करण्यात आला. जगभरातील तरुणांसोबतच सिद्धेशचा जर्मनीमध्ये सन्मान करण्यात आला.
सिद्धेश हे शेतकरी असून एग्रो रेंजर्स या संस्थेचे संस्थापक आहे, ही संस्था शेतजमिनीतील मातीची झीज दूर करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या पाच वर्षांत, त्यांनी आंतरपीक-आधारित कृषी वनीकरण मॉडेल विकसित करण्यासाठी विस्तृत संशोधन केले आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते आणि हवामान बदलाचेही परिणाम कमी करते.
या नाविन्यपूर्ण कृषी वनीकरण पद्धतींद्वारे आपल्या समुदायातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची सिद्धेशला आवड असून त्यांच्या नेतृत्वाखाली एग्रो रेंजर्स या संस्थेची स्थापना केली आहे. अल्पभूधारक शेतकरी समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे. मातीच्या ऱ्हासाचा सामना आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी ते झटत आहेत. ग्रामीण शेतीच्या पार्श्वभूमीतून मिळालेले त्यांचे यश हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तरुणांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे.