एटीएम न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भाताची तीन नवी वाण विकसित केली आहेत.
भाताची तीन नवी वाण कोकण संजय, कर्जत १० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या वाणांचा समावेश आहे. या तीनही वाणांना केंद्रीय वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. पुढील हंगामापासून हे वाण वितरणात येणार आहेत.
कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांच्या पथकामार्फत ही तीन नवीन वाण विकसित करण्यात आली आहेत.
विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण या वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने यापुर्वीच मान्यता दिली होती. आज केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही या तिन्ही वाणांना मान्यता दिली आहे.
कर्जत-१० वाणाची वैशिष्ट्य :
- कर्जत-१० हे वाण गरवा प्रकारातील आहे.
- या वाणाची लागवड केल्यापासून साधारणपणे १४० ते १४५ दिवसात उत्पादन मिळू शकणार आहे.
- या वाणाची उत्पादकता हेक्टरी ४५ ते ५५ विंचटल आहे.
- हे वाण पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त असणार आहे.
- हे वाण प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
ट्रॉम्बे कोकण खारा वाणाची वैशिष्ट्य :
- हे वाण निमगरवा प्रकारातील आहे.
- या वाणाचे लागवडीपासून साधारणपणे १२५ ते १३० दिवसांनी उत्पादन मिळते.
- हे वाण लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील आहे.
- या वाणाचे हेक्टरी ४० ते ४५ क्विटल उत्पादन मिळते.
- कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी हे वाण उपयुक्त आहे.
- ६ ईसी पर्यंत क्षार सहन करणारी क्षमता या वाणाची आहे.
कोकण संजय वाणाची वैशिष्ट्य :
- हे वाण निमगरवा प्रकारातील आहे.
- या वाणाचे लागवडीपासून १२५ ते १३० दिवसात पिक कापणीसाठी तयार होते.
- हे वाण लांबट आणि बारीक दाण्याचे आहे.
- या वाणाचे प्रती हेक्टरी ५० ते ५५ क्विटल उत्पादन मिळते.
- हे वाण किड आणि रोगास मध्यम प्रतिकारक आहे.