एटीएम न्यूज नेटवर्क ः 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतातून कृषी रसायनांची निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या 4.9 अब्ज डॉलर (रु. 36,521 कोटी) च्या तुलनेत 5.4 अब्ज डॉलर (रु. 43,223 कोटी) च्या नवीन शिखरावर पोहोचली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची कृषी रसायन निर्यात 2017-18 मधील 2.6 अब्ज डॉलरवरून गेल्या आर्थिक वर्षात 5.4 अब्ज डॉलर झाली आहे. ही निर्यात उत्पादन क्षेत्रातील सर्वोच्च म्हणजेच 13% च्या प्रभावी चक्रवाढ वार्षिक वाढ दरा (सीएजीआर) ने वाढली आहे. निरीक्षकांच्या मते युरोपियन संघ वगळून भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा कृषी रसायनांचा निर्यातदार देश आहे.
भारताच्या कृषी रसायनांच्या निर्यातीचा आकार भारताच्या कृषी रसायनांच्या देशांतर्गत बाजाराच्या आकारापेक्षा खूप जास्त आहे. जागतिक स्तरावर कृषी रसायनांची बाजारपेठ 74 अब्ज डॉलर इतकी आहे. यापैकी सुमारे 80% बाजारपेठ पोस्ट पेटंट रसायनांची आहे. पेटंटनंतरच्या कृषी रसायनांसाठी भारत एक पसंतीचे जागतिक केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे.
याबद्दल बोलताना क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीएफआय) चे अध्यक्ष दीपक शाह म्हणाले, की भारतीय कृषी रसायन उद्योगाला "निर्यात गहन उद्योग" म्हणून ओळखले जाणे आवश्यक आहे. सर्व नवीन गुंतवणूक आणि प्रकल्प जलद मार्गावर आणणे आवश्यक आहे. असे केल्यास कृषी रसायनांची निर्यात पुढील ३-४ वर्षांत १० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करू शकते.
तांत्रिक नोंदणीशिवाय कीटकनाशक सूत्रीकरणाच्या आयातीला परवानगी न देण्याच्या भारत सरकारच्या अलीकडील निर्णयामुळे "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना मिळेल, आयात कमी होईल आणि निर्यात वाढेल, असेही ते म्हणाले. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत कृषी रसायनांचा समावेश करण्यासाठी सीसीएफआयने यापूर्वीच अर्थ मंत्रालयाला निवेदन दिले आहे.
सीसीएफआयचे सल्लागार एस. गणेशन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रिप्स-प्लस उपाय (जसे की डेटा एक्सक्लुझिव्हिटी, पेटंट मुदत विस्तार इ.) मंजूर न करण्याचे भारत सरकारचे धोरण पेटंटनंतरच्या उत्पादनांच्या स्थानिक उत्पादनास मोठ्या प्रमाणात मदत करते. ते पुढे म्हणाले, की 20 पेक्षा जास्त कीटकनाशकांचे रेणू आता आणि 2030 दरम्यान पेटंटमधून बाहेर पडतील. यामुळे भारतीय उद्योगाला उत्कृष्ट वाढीची संधी मिळेल.
130 हून अधिक देशांतील लाखो शेतकरी भारतीय कृषी रसायनांवर त्यांच्या दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतींसाठी विश्वास ठेवतात, असे एका उद्योग निरीक्षकाने सांगितले. वाटाघाटी अंतर्गत एफटीएमध्ये भारत सरकारला जागतिक शेतीसाठी कृषी रसायनांचा एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून आपल्या देशाला स्थान देणे आवश्यक आहे, असे सीसीएफआयने सुचविले आहे.