एटीएम न्यूज नेटवर्क : नाशिक येथे दि. २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान मीडिया एक्झिबिटर्स प्रा.ली.द्वारे "कृषीथॉन" ह्या भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शनाच्या सतराव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. १९९८ मध्ये मुहूर्तमेढ झालेले कृषीथॉन हे शेतकरी, जाणकार, उद्योजक आणि सरकारी - निमसरकारी संस्था यासाठी अभिनव व्यासपीठ ठरले आहे. दरवर्षी भारतभरातून १ लाखाहून अधिक शेतकरी बांधव ह्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात आणि नवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना अवगत करतात तसेच उद्योजकांना देखील त्यांच्या उत्पादनाची माहिती पोहचविण्यासाठी कृषीथॉन उपयुक्त ठरले आहे.
कृषीथॉन प्रदर्शनाचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार (MSME) च्या "पी एम एस योजना" अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. ह्या अंतर्गत सहभाग घेणाऱ्या पात्र सूक्ष्म आणि लघु उद्योगांना स्टॉल भाड्यावर ८०% पर्यंत सबसिडी (रीइम्बर्समेंट) मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश एमएसएमईंना त्यांच्या वाढीला चालना देऊन पाठिंबा देणे हा आहे. ह्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मार्केटिंगची मोठी संधी प्राप्त होणार आहे. सदर योजनेसाठी पात्रता मिळविणारे "कृषीथॉन" हे निवडक प्रदर्शनापैकी एक आहे अशी माहिती सह आयोजक साहिल संजय न्याहारकर ह्यांनी दिली.
कृषीथॉनची स्टॉल बुकिंग सुरु झाली असून सदर योजनेअंतर्गत स्टॉल बुकिंग करण्यासाठी उद्योजकांनी लवकरात लवकर आयोजकांना संपर्क साधावा. कारण ह्या योजनेअंतर्गत मर्यादित स्टॉल उपलब्ध असतात आणि त्यांचे वितरण प्रथम येईल त्या तत्त्वावर बुक करणाऱ्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात येते. अधिक माहितीसाठी ९८२२८४२२६५ ह्या वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.