एटीएम न्यूज नेटवर्क : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंभारा येथील श्री. गणेश शामराव नानोटे यांना यंदाचा कृषीथॉन आदर्श शेतकरी सन्मान मिळाला आहे. श्री. नानोटे यांनी शेतीक्षेत्रात संशोधन आणि माहिती विस्ताराचे काम केले आहे. ते शेतात कापूस, केळी, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू तसेच जवस पिके घेतात,
कमी मशागत तंत्र
"जमिन श्रीमंत तर शेतकरी श्रीमंत" याचा आधार घेत आणि विविध समस्यांचा विचार करून ते संवर्धित शेती करतात. मागील पंधरा वर्षांपासून शेतातील कचरा, पीक अवशेष शेतातच कुजवत असून खोल नांगरटीस बगल दिली आहे. त्यांनी कमी मशागत तंत्र अवलंबले असल्याचे श्री. नानोटे यांनी स्पष्ट केले.
जैविक खतांचा वापर
त्यांच्या शेतीच्या बाबतीत ते म्हणाले कि, 'जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे शेतीचा प्राण आहे. तो मी वाढवला असून जमीन भुसभुशीत पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे सुधारला असून त्यामुळे जमिनीची होणारी धूप आणि वाहून जाणारे पाणी संवर्धन करण्यास कमालीची मदत झाली. श्री नानोटे हे जैविक खतांचा वापर करून पिकाचे उत्पादन घेतात. जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला असून याच्या परिणामाने पीक उत्पादन वाढले आहे.
जमिनीतील जैविक घटक वाढवले
जमिनीची भौतिकता सुधारल्याने पावसाचा प्रत्येक थेंब जागेवर जिरविणे शक्य झाले. पाणी आणि जमिनीची होणारी प्रचंड प्रमाणातील धूप थांबली. जमिनीतील जैविक घटक वाढण्यास मदत झाली. यामुळे पीक उत्पादनात शाश्वतता आली. दुष्काळी परिस्थिती असतांना सुद्धा पिकांच्या वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के पर्यंत वाढ दिसून आली..
तंत्रज्ञानाचा अवलंब प्रत्यक्ष शेतात
श्री. नानोटे हे देशातील आणि विविध राज्यातील वेगवेगळी संशोधन केंद्र, विद्यापीठे, कृषी प्रदर्शने, प्रकल्प यांना भेटी देऊन माहिती व तंत्रज्ञान समजून त्यांचा अवलंब प्रत्यक्ष शेतात करतात. त्याबरोबरच ते इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवून त्याचा अवलंब कसा करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून ते सर्व प्रयोग त्यांच्या शेतावर करून घेतले आहेत. त्यांच्या शेतावर विविध पिकांवर आधारित शिवार फेरीचे आयोजन केले जाते.. विविध पिकांवर सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले जाते. विविध दैनिके, आकाशवाणी आणि टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून श्री. गणेश नानोटे यांच्या यशोगाथा प्रकशित झाल्या आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शाश्वत आणि संवर्धित शेतीचा अवलंब श्री. नानोटे यांनी शेतीत केला असून इतर शेतकऱ्यांना त्यांनी संवर्धित शेतीकरिता प्रोत्साहित केले आहे. कृषी विद्यापीठातील एम.एस.सी तसेच पी.एच.डी. करीता सुरु असलेल्या शेती पद्धतीवर प्रयोग करण्यास ते मदत करतात. कृषी विभागामार्फत येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून दखल
श्री. गणेश नानोटे यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून आहे. शेती क्षेत्रात स्वतःची प्रगती करत असताना इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल यावर त्यांचा कायम भर राहिला आहे.