एटीएम न्यूज नेटवर्क ः सकल देशांतर्गत उत्पादनात अन्नप्रक्रिया क्षेत्राचे योगदान वाढल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2016-17 मधील 1.79 लाख कोटी रुपये इतक्या सकल मूल्यवर्धनावरून 2020-21 मध्ये 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही वाढ 7.27% च्या वार्षिक चक्रवाढ दराने झाली आहे. अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पटेल म्हणाले की, अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह सकल राष्ट्रीय उत्पन्नात योगदान वाढवण्यासाठी कोणतेही लक्ष्य निश्चित केलेले नाही. तथापि, नोंदणीकृत उत्पादन क्षेत्रातील रोजगारांमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्राचे योगदान १२.२% आहे. मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि धोरणात्मक उपक्रमांमुळे भारताच्या सकल मूल्यवर्धनामध्ये या क्षेत्राचे योगदान वाढत आहे.
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून प्रधानमंत्री किसान संपदा योजना लागू केली जाते. कापणीनंतरच्या आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती, मूल्यवर्धन वाढवणे, शेतकऱ्यांना चांगला परतावा देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त मंत्रालयाकडून देशभरात दोन लाख सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांच्या स्थापनेसाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाची पीएम-फॉर्मलायझेशन योजना देखील राबविली जात आहे. जागतिक अन्न उत्पादनाच्या निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी अन्नप्रक्रिया क्षेत्रात एक नवीन उत्पादन प्रोत्साहन योजना लागू केली जात आहे. या योजनेमुळे या क्षेत्रासाठी अधिक रोजगाराच्या संधी आणि उच्च निर्यातही होण्याचा अंदाज आहे.
गेल्या तीन वर्षांची आकडेवारी अशी : 2017-18 - 1.93 लाख कोटी रु. , 2018-19 - 2.36 लाख कोटी रु., 2019-20 - 2.26 लाख कोटी रु., 2020-21 - 2.37 लाख कोटी रु.