नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची आज नवी दिल्ली येथील कृषी भवनात आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय विकास संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनाइजेशन (FAO), वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP), इंटरनेशनल फंड फॉर ऍग्रीकल्चरल डेवलपमेंट (IFAD), वर्ल्ड बँक, एशियन डेवलपमेंट बँक (ADB), डॉयचे गेसेलशाफ्ट फ्यूर इंटरनेशनेले जुसामेनआर्बाइट (GIZ) तसेच जपान इंटरनेशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या बैठकीचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करणे, दीर्घकालीन विकासाच्या धोरणांवर एकत्रितपणे काम करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबवणे हा होता.
यावेळी बोलताना कृषिमंत्री चौहान म्हणाले की, भारताने कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. एकेकाळी अन्नधान्याची कमतरता असलेला देश आज अनेक कृषी उत्पादनांचा मोठा निर्यातदार बनला आहे. या बदलामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताने अन्नसुरक्षा साध्य केली असून आता पोषण सुरक्षा आणि शेतकऱ्यांसाठी टिकाऊ रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत इतर देशांबरोबर आपले अनुभव आणि यशस्वी पद्धती शेअर करू शकतो आणि जागतिक पातळीवरील चांगल्या कल्पनांमधून शिकून कृषी क्षेत्राचा विकास साधू शकतो, असेही ते म्हणाले.
बैठकीदरम्यान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनी समावेशक शेती, लहान व मध्यम शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक चांगली पोहोच, तसेच युवक, महिला आणि शेतकरी संघटनांच्या सक्षमीकरणावर भर दिला.
यासोबतच तंत्रज्ञान व नवकल्पना, डिजिटल शेती, संशोधन व विकास, काढणीपश्चात सुविधा, हवामान बदलांना तोंड देणारी पिके आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन या विषयांवरही चर्चा झाली. कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि वित्तपुरवठा वाढवण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
चौहान यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचे स्वागत करत प्रतिनिधींना धन्यवाद दिले. या चर्चांमुळे कृषी क्षेत्रातील दीर्घकालीन धोरणे अधिक प्रभावी होतील आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणखी बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.