पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister) यांनी बुधवारी भारतीय शेतकऱ्यांना (Indian Farmers) विशेष संदेश देत नैसर्गिक शेती (Natural Farming) स्वीकारण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेती हि पर्याय नसून, भविष्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कोइम्बतूर (Coimbatore) येथे नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेतल्या (South India Natural Farming Summit) अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी या संकल्पनेला भारतीय कृषी क्षेत्रातील आगामी क्रांतीचा केंद्रबिंदू म्हटले.
एक्स (X) वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले, “नैसर्गिक शेतीचा विस्तार ही २१ व्या शतकातील (21st Centuary) शेतीची खरी मागणी आहे.” मातीचा ऱ्हास थांबविणे, शेतकऱ्यांचा इनपुट खर्च कमी करणे आणि हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना तोंड देणे या तिन्ही गोष्टींमध्ये या पद्धतीची प्रभावी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
मोदींनी शेतकऱ्यांना साध्या पण प्रभावी पद्धतीने सुरुवात करण्याचे आवाहन केले. “एक एकर, एक हंगाम.” यामुळे शेतकरी मोठ्या गुंतवणुकीशिवाय नैसर्गिक शेतीच्या फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील. तसेच पुढील पिढीला तयार करण्यासाठी कृषी महाविद्यालयांनीही आपल्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश करावा, असे त्यांनी अधोरेखित केले.
रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरापासून मुक्त असलेली नैसर्गिक शेती आधीच अनेक ठिकाणी आशादायी निकाल देत आहे. माती अधिक सुपीक, पिके अधिक तगडी आणि नफा अधिक स्थिर होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) या परिवर्तनाला वेग देत असून, तब्बल ७.५ लाख हेक्टर क्षेत्र आणि एक कोटी शेतकरी या उपक्रमातून लाभ घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पंतप्रधान मोदींचे हे आवाहन भारताच्या शाश्वत, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या बलवान कृषी व्यवस्थेकडे नेणाऱ्या मोठ्या प्रवासातील एक निर्णायक पाऊल मानले जात आहे. नैसर्गिक शेती आता केवळ तंत्र नाही, तो भारताच्या कृषी भविष्याचा आधारस्तंभ ठरतोय.