नवी दिल्ली : कृषी आणि अन्नसुरक्षा क्षेत्रात भारत-फिजी सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी फिजीचे कृषी व जलमार्ग मंत्री तोमासी तुनाबुना यांच्यासोबत नवी दिल्लीतील कृषी भवन येथे द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांतील विद्यमान सहकार्याचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान चौहान यांनी भारत व फिजी यांच्यातील ऐतिहासिक व मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत परस्पर सन्मान, सांस्कृतिक नाते आणि जनतेतील दृढ संबंधांमुळे हे सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. कृषी आणि अन्नसुरक्षा ही दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असून, या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांना अधिक गती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही मंत्र्यांमध्ये परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी विद्यमान सामंजस्य करार (MOU) पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यावर सहमती झाली. तसेच कृषी क्षेत्रातील सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी संयुक्त कार्यगट (Joint Working Group) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सहकार्यांतर्गत विद्यार्थी आदान-प्रदान, प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम, लघु कृषी यंत्रसामग्री तसेच डिजिटल शेतीशी संबंधित तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान यावर भर देण्यात येणार आहे. यासोबतच कृषी संशोधन सुविधा बळकट करणे, आनुवंशिक संसाधनांचे आदान-प्रदान आणि अन्नाची नासाडी व अपव्यय कमी करण्यासाठी ज्ञानवाटप या विषयांवरही चर्चा झाली.
या बैठकीला फिजीच्या प्रतिनिधिमंडळात बहुजातीय व्यवहार व साखर उद्योग मंत्री चरणजीत सिंह, फिजीचे उच्चायुक्त महामहिम जगन्नाथ सामी, साखर मंत्रालयाचे स्थायी सचिव डॉ. विनेश कुमार, फिजी शुगर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नित्या रेड्डी तसेच फिजी उच्चायोगातील सल्लागार पाउलो दाउरेवा उपस्थित होते.
भारताकडून कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव एम. एल. जाट यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.