एटीएम न्यूज नेटवर्क ः राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या उद्देशाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) दूध खवा, पनीर, तूप, लोणी, दही, आईस्क्रीम दूध आणि इतर उत्पादनांवर देशव्यापी लक्ष ठेवणार आहे.
आधी कोविड-१९ मुळे दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अगदी अलीकडील काळात लम्पी आजारामुळे देशात 1.9 लाख जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच जनावरांचा चारा 30% पर्यंत महाग झाल्यामुळे या दूध व्यवसायाला फटका बसला आहे. देशात कथितरित्या दूधटंचाईला तोंड देत असून, सहकारी संस्थांनी यावर्षी केवळ १-२% उत्पादन वाढल्याचे म्हटले आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातही चांगली परिस्थिती नसल्याच्या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयने ही घोषणा केली.
दरम्यान, प्रस्तावित निरीक्षणाचे तपशील देताना एफएसएसएआयने सांगितले की, या काळात दूध आणि त्याच्या उत्पादनांमध्ये भेसळीची ठिकाणे ओळखली जातील. या अभ्यासाच्या परिणामांवर आधारित सुधारात्मक कृती/रणनीती तयार करून पुढील मार्ग सुचविण्यात येणार आहे.
“दुधामध्ये महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक तत्व असतात. प्रत्येक वयोगटातील लोक त्यांच्या दैनंदिन आहारात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करतात. बदलत्या जीवनशैलीचे नमुने आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हे भारतातील दूध आणि उच्चमूल्य असलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या वाढीचे प्रमुख चालक आहेत,’’ असे एफएसएसएआयने म्हटले आहे.
गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या अनुपालनासाठी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची चाचणी केली जाईल. यापूर्वी एफएसएसएआयने २०११, २०१६ आणि २०२० मध्ये दुधावर संपूर्ण देशात सर्वेक्षण केले होते. यादरम्यान संकलित केलेले सर्व नमुने गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या गंभीर मापदंडांसाठी तपासले गेले होते.
“२०२२ मध्ये एफएसएसएआयने निवडक १२ राज्यांमध्ये दुधाचे सर्वेक्षण केले होते. (ज्यामध्ये १० राज्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आढळला, तर २ राज्यांत प्रादुर्भाव आढळला नाही). बाधित जनावरांमध्ये प्रतिजैविक/पशुवैद्यकीय औषधांचा वापर आणि शेडमध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्याने दूध दूषित होऊ शकते. दुधाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये प्रतिजैविक, कीटकनाशकांचे अवशेष आणि जड धातूंच्या उपस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. सर्वेक्षणाच्या निकालावरून असे दिसून आले आहे, की निवडक १२ राज्यांमधील दूध वापरासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे,’’ असे एफएसएसएआयने नमूद केले.