एटीएम न्यूज (नाशिक): राज्यात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र सध्या मान्सूनने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, सध्या वातावरण हे पावसासाठी (Monsoon) हवे तसे अनुकूल नसल्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा जोर का कमी झाला?
पश्चिमेकडून वाहणारे कोरडे वारे (Dry winds) आणि वातावरणातील आर्द्रतेत (Humidity) घट झाल्यामुळे राज्यात पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे कोकणासह (Konkan) मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता सध्या कमी झाली असली, तरी ही परिस्थिती कायम राहणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे (Meteorologist) मत आहे.
मान्सून पुन्हा कधी होणार सक्रिय?
बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ही प्रणाली सक्रिय झाल्यानंतर अरबी समुद्रातून (Arabian Sea) येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांना चालना मिळेल. त्यामुळे १७ जुलैनंतर कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो, तर २० जुलैनंतर मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि राज्यातील इतर अनेक भागांत मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागात कसा असेल पावसाचा अंदाज?
आजच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर हलक्या सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. साताऱ्याच्या घाटमाथ्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून सोलापूर (Solapur) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) नाशिक (Nashik), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), नंदुरबार (Nandurbar), अहिल्यानगर (Ahilyanagar), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), हिंगोली (Hingoli) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र परभणी (Parbhani), बीड (Beed), लातूर (Latur) आणि धाराशिवमध्ये (Dharashiv) पावसाची शक्यता कमी असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील (Vidarbha) नागपूर (Nagpur), अमरावती (Amrawati), अकोला (Akola), बुलढाणा (Buldhana), वर्धा (Vardha), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांत पुढील एक-दोन दिवस पावसाचा प्रभाव कमी राहू शकतो. मात्र १६ जुलैनंतर विदर्भातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
पावसातील (Monsoon) या खंडाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी तणनियंत्रण (weed control), आंतरमशागत, खत व्यवस्थापन (Fertilizer Management) आणि पिकांची पाहणी यांसारखी कामे पूर्ण करावीत. तसेच पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतातील पाण्याचा निचरा आणि पिकांच्या संरक्षणाची तयारी ठेवणेही आवश्यक आहे.