अॅग्री ट्रेड मीडिया नेटवर्क: केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील कृषिभवन येथे राष्ट्रीय बागायती बोर्ड (NHB) ची ३३ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बागायती क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, कृषिसचिव डॉ. देवेश चतुर्वेदी, आय सी ए आर (ICAR) महासंचालक डॉ. मांगीलाल जाट आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वाणिज्यिक बागायती विकास योजना, कोल्ड-चेन प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (CDP) आणि क्लीन प्लांट प्रोग्राम यांचा आढावा घेण्यात आला. कृषिमंत्री चौहान यांनी स्पष्ट निर्देश दिले की, योजनांची अंमलबजावणी वेळेत, पारदर्शक आणि शेतकरी-केंद्रित असावी तसेच शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी वेळेवर द्यावी. लहान शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा मिळायला हवा आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे चौहान यावेळी म्हणाले.
बागायती उत्पादने लवकर खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उत्पादनांची शेल्फ लाइफ वाढवण्याची रणनीती, चांगले पोस्ट-हार्वेस्ट व्यवस्थापन आणि जागरूकता कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले. यासोबतच त्यांनी गुणवत्तापूर्ण रोपे, आधुनिक बागायती तंत्रज्ञान, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवणे, राज्यनिहाय रोडमॅप तयार करणे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ व कोल्ड-चेनशी जोडणारी मजबूत व्यवस्था उभारण्यावर भर दिला.
बैठकीदरम्यान चौहान यांनी राष्ट्रीय बागायती बोर्ड (NHB) द्वारे तयार केलेल्या गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टिस, सेंद्रिय शेती मॉडेल आणि प्रगत बागायती तंत्रज्ञानावरील तांत्रिक पुस्तकांचेही प्रकाशन केले. ही पुस्तके शेतकरी, कृषी उद्योजक आणि तज्ज्ञांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरणार आहेत. राष्ट्रीय बागायती बोर्ड देशभरात वाणिज्यिक बागायती आणि कोल्ड-चेन अवसंरचना विकासासाठी कार्यरत असून, या बैठकीत सर्वसमावेशक चर्चा आणि क्षेत्रनिहाय दृष्टीकोनाला चालना मिळाली.